सलग आठव्या दिवशीही रायगडातील एसटी सेवा ठप्पच

रायगड विभागाचे 2 कोटी 80 लाखांचे नुकसान

By Raigad Times    15-Nov-2021
Total Views |
ST strike raigad _1 
 
आतापर्यंत 41 कर्मचारी निलंबीत
 
पेण (देवा पेरवी/प्रदीप मोकल) । एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसह महागाई भत्ता, घरभत्ता या मागण्यांसाठी मागील सोमवारपासून सुरु झालेला एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा संप आज (15 नोव्हेंबर) सलग आठव्या दिवशीही सुरुच राहिला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील लालपरीची सेवा ठप्प असून, या संपामुळे रायगड विभागाचे 2 कोटी 80 लाखांचे नुकसान झाले आहे.
 
राज्यातील एसटी कर्मचार्‍यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर संपाचे हत्यार उगारले आहे. यातील महागाई भत्ता, घरभत्ता या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण या मागणीवर कोणताही निर्णय झालेला नाही. या मागणीसाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपात रायगड विभागातील सर्व कर्मचारी विशेषतः चालक व वाहक हेदेखील सामील झाल्याने रायगडातील लाईफ लाईन म्हणून समजल्या जाणार्‍या लालपरीची सेवा सोमवारपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे.
 
आज संपाचा सलग आठवा दिवस असून राज्य सरकार व कर्मचारी यांच्यात कोणताही योग्य मार्ग निघालेला नाही. मात्र या संपामुळे प्रवासी, विद्यार्थीवर्गाचे प्रचंड हात होत आहेत.
 
रायगड विभागाचे 2 कोटी 80 लाखांचे नुकसान
 
रायगड विभागातील पेण, माणगांव, अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, कर्जत, महाड या आठ ही आगारातील सर्वच कर्मचारी संपामध्ये सामील झाले आहेत. यामुळे रायगड विभागाला दिवसाला मिळणारे सुमारे 35 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून आतापर्यंत 2 कोटी 80 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
 
जवळपास सर्वच कर्मचारी संपात सहभागी
 
रायगड विभागातील महाड, श्रीवर्धन, पेण, माणगांव, अलिबाग, मुरुड, कर्जत, रोहा या आठ आगारांत 1 हजार 841 कर्मचारी काम करत आहेत. यामध्ये 503 वाहक, 493 चालक असून 19 हे वर्ग दोनचे अधिकारी व 806 प्रशासकीय व कार्यशाळा कर्मचारी काम करत आहेत. यातील आगारातील वाहक व चालक यांच्याबरोबर इतर असे सुमारे जवळपास सर्वच कर्मचारी संपात सामील झाले आहेत.
 
मुख्यालयातील 15 टक्के कर्मचारी कामावर
 
रायगड परिवहन विभागाचे मुख्यालय असलेल्या रामवाडी (पेण) येथील मुख्य कार्यालयातील एकूण कर्मचार्‍यांपैकी 15 टक्के असलेला अधिकारी वर्ग कामावर हजर आहेत.
 
आतापर्यंत 41 कर्मचारी निलंबीत
 
रायगड विभागातील संपामध्ये सामील झालेल्या कर्मचार्‍यांपैकी 41 कर्मचार्‍यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.