माणगाव । माणगाव शहरातील इशरत प्लाझा इमारतीत भरदिवसा चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून 5 लाख 20 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरांचा शोध सुरु आहे. दरम्यान, भरदिवसा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना मंगळवारी (9 नोव्हेंबर) दुपारी 1 ते 1.15 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद विजय दत्तू सत्वे यांनी पोलिसात दाखल केली आहे. सत्वे यांच्या माणगाव कचेरी रोड येथील इशरत प्लाझा इमारतीतील बी विंगमधील चौथ्या मजल्यावरील रुम नं. 411 मध्ये ही चोरी झाली आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करुन, 5 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले.
यामध्ये सोन्याचे 2 गंथन, चार अंगठ्या, दोन मोत्याच्या नथ, बांगड्या, पेंडल असलेला नेकलेस, कानातील सोन्याची कुडी, कानातील साखळी, कानातील रिंग, चांदीचे पैंजण याचा समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांवर माणगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर हे करीत आहेत.