दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोने उपलब्ध करुन दिली सुवर्णसंधी

सर्वसामान्य नागरिकांसह विकासक, व्यावसायिकांसाठी भूखंड, वाणिज्यिक गाळे विक्रीची भव्य योजना

By Raigad Times    31-Oct-2021
Total Views |
CIDCO _1  H x W
 
नवी मुंबई : यावर्षीच्या दिवाळीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी सिडको महामंडळाने विविध योजनांतर्गत, नवी मुंबईच्या विविध नोडमधील सामाजिक उद्देशाचे तसेच निवासी, वाणिज्यिक, निवासी तथा वाणिज्यिक भूखंड आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्रीची भव्य योजना आणली आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या खारघर, पनवेल, पुष्पक नगर नोडमधील भूखंड आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानक संकुलांतील व सिडकोच्या गृहनिर्माण संकुलांतील वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 
यात सिडकोच्या सामाजिक सेवा उपक्रमांतर्गत वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यार्थी वसतिगृहासोबतच निवासी, वाणिज्यिक, निवासी तथा वाणिज्यिक वापराकरिता लहान व मध्य आकाराचे भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कोविडोत्तर काळात नवी मुंबईतील बांधकाम क्षेत्रासह अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरिता सिडकोकडून सातत्याने भूखंड विक्रीच्या योजना आणल्या जात असून, सदर योजनाही सिडकोच्या या प्रयत्नांचाच एक भाग आहे.
 
सिडकोकडून नवी मुंबईचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध उद्देशांकरिता असलेल्या भूखंड सातत्याने विक्रीकरिता उपलब्ध करून दिले जातात. त्याचप्रमाणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता सिडकोकडून आपल्या गृहनिर्माण योजनांद्वारे परवडणाऱ्या दरातील घरे (सदनिका) सातत्याने उपलब्ध करून दिली जातात. या योजनेद्वारे सिडकोने लहान व मध्यम आकारांचे भूखंड उपलब्ध करून दिले असून या भूखंडांची मालकी निर्वेध (क्लिअर टायटल) आहे.
 
प्रचलित दरांपेक्षा या भूखंडांचे दर तुलनेने कमी असून नवी मुंबईतील सुविकसित नोडमध्ये हे भूखंड स्थित आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईमध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची तर छोट्या व मध्यम विकासकांना आपल्या स्वप्नातील प्रकल्प विकसित करण्याची संधी याद्वारे उपलब्ध होणार आहे. या योजनेतील वाणिज्यिक गाळे हे नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी आणि सुप्रस्थापित बाजारात असल्याने व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धिची व गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची संधी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
 
नवी मुंबईच्या सुविकसित परिसरात पुनर्विक्रीद्वारे (रिसेल) वाणिज्यिक गाळे मिळणे दुरापास्त असल्याने व्यावसायिकांना व सर्वसामान्य नागरिकांना या योजनेद्वारे वाणिज्यिक गाळे मिळण्याची सुसंधी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक उद्देशांकरिता भूखंड उपलब्ध करून देत सिडकोने नेहमीप्रमाणे भौतिक आणि सामाजिक विकासातील समतोलही साधला आहे.
 
नवी मुंबईला उपनगरी रेल्वे, महामार्ग व अंतर्गत रस्त्यांचे जाळे यांमुळे उत्तम संधानता (कनेक्टिव्हिटी) लाभली आहे. नजीकच्या काळात साकार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे नवी मुंबई थेट जगाला जोडली जाणार आहे. तसेच सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन सेवा अधिक सक्षम होणार आहे. यामुळे सदर योजनेतील भूखंडांना आणि वाणिज्यिक गाळ्यांना लाभलेली सुसंधानता हा विकासक आणि व्यावसायिकांकरिता एक अतिरिक्त लाभ ठरणार आहे.
 
सदर योजना या ई-निविदा व ई-लिलाव पद्धतीने पार पडणार आहेत. या योजनांकरिता निविदाकारांची नोंदणी, अर्ज सादर करणे, अनामत रकमेचा भरणा करणे, बंद निविदा सादर करणे, ई-लिलाव प्रक्रिया व योजना पुस्तिका इ. सर्व तपशील सिडकोच्या https://eauction.cidcoindia.com या ई-लिलाव संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 
कोविड-19 पश्चात बांधकाम क्षेत्रासह अन्य क्षेत्रांत उभारी आणण्याकरिता सिडकोच्या अन्य योजनांप्रमाणे या योजनाही उपयुक्त ठरणार आहेत. तरी अधिकाधिक बांधकाम व्यावसायिक, विकासक यांसह सर्वसामान्य नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.