आंबा, काजू पिकासाठी विमा योजनेचा लाभ घ्या; कृषी विभागाचे आवाहन

30 Oct 2021 13:19:01
kaju_1  H x W:
 
तळा | तळा तालुक्यामध्ये भात पिकानंतर काजू व आंबा ही महत्त्वाची पिके आहेत. फळ पिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने चांगले उत्पन्नही मिळते; परंतु मागील २-३ वर्षांचा अंदाज घेता हवामानातील बदलामुळे होणारे नुकसान विचारात घेऊन शासनाने शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी हवामान आधारित फळपिक विमा योजना सुरु केली आहे. २०२१-२२ ते २०२३- २४ या ३ वर्षांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक झाली आहे.
 
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ही योजना ऐच्छिक आहे; परंतु योजनेत सहभाग घ्यावयाचा नसल्यास कर्जदार शेतकर्‍यांना विहित मुदतीमध्ये घोषणापत्र बँकेला सादर करणे आवश्यक आहे. कुळाने तसेच भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. काजूसाठी १ डिसेंबर २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अवेळी पाऊस व कमी तापमान या बाबींसाठी नुकसान भरपाई देय असणार आहे.
 
तसेच आंबा पिकासाठी १ डिसेंबर २०२१ ते १५ मे २०२२ पर्यंत अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान व वेगाचा वारा इ. बाबींसाठी भरपाई देय असणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक खाते, फळबाग उत्पादनक्षम असल्याबाबत स्वयंघोषणापत्र व फळबागेचा सशेींरस केलेला फोटो इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक, विविध कार्यकारी सोसायटी, आपले सरकार केंद्र तसेच पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in च्या माध्यमातून योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
 
आंबा पिकासाठी प्रति हेक्टर ९३ हजार ८०० रुपये इतका विमा हप्ता असून त्यापैकी शेतकरी हिस्सा २९ हजार ४०० रुपये प्रती हेक्टर म्हणजेच २९४ रुपये प्रति झाड व काजू पिकासाठी एकूण विमा हप्ता ३० हजार रुपये प्रति हेटर इतका असून त्यापैकी शेतकरी हिस्सा ५ हजार रुपये प्रति हेटर म्हणजेच २५ रुपये प्रति झाड याप्रमाणे आहे. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासन अनुदान म्हणून विमा कंपनीस देणार आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी साहाय्य्क, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे तसेच जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0