केवनाळे येथील दरडीग्रस्त मृत व्यक्तीच्या नातेवाईकावर हल्ला

By Raigad Times    29-Oct-2021
Total Views |
kalvne_1  H x W
 
पोलादपूर । 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीवेळी केवनाळे येथील दरडीखाली मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकावर काही ग्रामस्थांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.
 
केवनाळे येथील धोंडीराम दाभेकर यांचे चुलत आजोबा गेनू गणपत दाभेकर, चुलत आजी इंदिराबाई गणपत दाभेकर आणि चुलत भाऊ सुनील केशव दाभेकर तसेच चुलत वहिनी शिल्पा सुनील दाभेकर या चौघांचा घरावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला होता.
 
गावातील दुर्दैवी मृतांच्या नातेवाईकांचे सरकारकडून पुर्नवसनाचे काम सुरु आहे. धोंडीरामचे रस्त्यालगत पुर्नवसन करण्याबाबत काहींचा आक्षेप आहे. यामुळे गावातील तिघांनी धोंडीराम याला, तुला फक्त रस्त्यालगतच्या घरांचे पुनर्वसन झालेले हवे, बाकी लोकांचे नको म्हणून तू मुंबईतील भावाला सांगितलेस, असा जाब विचारत मारहाण केली. याबाबत धोंडीराम दाभेकर यांने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
 
धोंडीराम सोनू दाभेकर याने अतिवृष्टी काळामध्ये केलेल्या बचाव व मदतकार्याबद्दल त्याचा अलिबाग येथे स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला होता. मात्र, त्याच्यावरच हल्ला झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
 
दरम्यान, तळीये येथे देखील अशाप्रकारचा प्रकार झाला होता. याबाबतदेखील महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.