म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण

११ पदे रिक्त; अधीक्षकांना करावी लागते कसरत

By Raigad Times    22-Oct-2021
Total Views |
seats_1  H x W:
 
कामांचा खोळंबा, हेलपाटे मारुन नागरिक हैराण
 
म्हसळा | म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. या कार्यालयातील १८ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अधीक्षकांना तारेवरची कसरत करावी लागतेय. तरदुसरीकडे कामांचा खोळंबा होत असून, नागरिक हेलपाटे मारुन हैराण झाले आहेत. हे चित्र बदलण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी जोर धरते आहे. म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयात विविध पदांची संख्या १८ आहे. त्यापैकी केवळ ७ पदे भरली असून तब्बल ११ पदे रिक्त असल्याची माहिती पुढे येत आहे.
 
नव्याने अधीक्षक भूमी अभीलेख या रिक्त जागी आलेले वाय.जी. कातडे यांच्याकडे तळा तालुक्याचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांच्यावर ताण येत आहे. वाय.जी. कातडे हे अनुभवी आहेत.त्यामुळे लॉकडाऊनमुळे गेली दोन वर्षे रखडलेली कामे त्यांच्या कुशल नेतृत्वाने पूर्णत्वाकडे नेण्याचे काम त्यांचे कार्यालयीन सहकारी करीत आहेत. भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त पदांमध्ये निमतानदार २, छाननी लिपिक १, दुरुस्ती लिपीक १, कनिष्ठ लिपीक १, भूकर मापक १, न.भू. लिपीक १, प्रति लिपीक १, दप्तर वबंद १, शिपाई ३ अशी ११ पदे आहेत. अपुर्‍या कार्यालयीन कर्मचार्‍यांमुळे म्हसळा शहर व तालुक्यातील नागरिकांची शेतजमीन, प्लॉट मोजणीची कामे काही काळ खोलंबळी असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
 
तसेच ग्रामीण उतारे, चतु:सीमा, फेरफार प्रकरणे, उतारे देणे, वारस लावणे, प्रॉपर्टी कार्ड काढणे आदी कामांसाठीनागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील आंबेत खाडीपट्टा भागातील नागरिकांना येण्या-जाण्याच्या सुविधा पुरेशा नसल्याने आणि ते अधिक खर्चिक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व भूमी अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबततात्काळ दखल घेऊन या कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जनतेकडून होत आहे.