म्हसळा : मोटारसायकल चोराच्या मुसक्या आवळल्या

चोरीच्या ४ मोटारसायकली हस्तगत

By Raigad Times    21-Oct-2021
Total Views |
Vehicle Theft Mhasla 1_1&
 
म्हसळा | म्हसळा पोलिसांनी एका मोटारसायकल चोराच्या मुसक्या आवळल्या असून, त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले आहे. पोलिसांनी चोरीच्या ४ मोटारसायकली हस्तगत केल्या असून, अधिक तपास सुरु आहे.
 
म्हसळा शहरातील नवेनगर परिसरांतील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातून प्रदीप तानाजी काळोखे यांची मोटारसायकल चोरीला गेली होती. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर, म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उध्दव सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांनी तपास सुरु केला.
 
सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि केवळ दोन दिवसात चोरीला गेलेली मोटासायकल हस्तगत करत मोटारसायकल चोराच्या मुसक्या आवळल्या. या चोराकडे अधिक तपास केला असता, त्याने महाड, पुणे येथील अन्य तीन मोटारसायकल चोर्‍यांचीही कबुली दिली.
 
या माहितीच्या आधारे म्हसळा पोलिसांनी चारही चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या. या चोर्‍यांप्रकरणी अटक केलेला २७ वर्षीय चोरटा हा म्हसळा शहरानजीकच्या सुरईचा राहणारा आहे.
 
दरम्यान, हा गुन्हा उघडकीस आणण्यात तपासी अंमलदार संतोष चव्हाण, पोलीस नाईक जाधव, पोलीस शिपाई हंबीर, पोलीस शिपाई खाडे, चालक पोलीस शिपाई फोपसे यांनी मोलाची कामगिरी बजावली.