खार गांधे येथील खाडी पात्रातील बंदीस्ती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

By Raigad Times    20-Oct-2021
Total Views |
pali copy_1  H
 
पाली/बेणसे | पेण तालुक्यातील खार गांधे येथील खाडीला लागून असलेली बांधबंदीस्ती खचून भूस्खलनाने खाडीपात्रातील बंदीस्ती उद्ध्वस्त होत आहे.
 
खारलँड विभागामार्फत तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी महत्वपूर्ण मागणी शिवसेनेच्यावतीने चोळे शाखाप्रमुख दीपक पाटील यांनी खारलँड विभागाला निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाची प्रत शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा आमदार महेंद्र दळवी यांना देण्यात आली आहे. पेण तालुक्यातील खार गांधे, खारचोळे व इतर खार ५०० एकर शेतीला असणारी बांधबंदीस्ती ही येथील शेतीचे संरक्षण करण्यासाठी आहेत. त्यामुळे येथील शेतकरी भातशेती करीत आहेत.
 
परंतु खार गांधे या दोन ठिकाणी साधारणतः १५० मीटर बांध हा पूर्णपणे खचला असून खाडी पात्रात गेल्यामुळे भरतीचे खार पाणी उभ्या पिकात येत आहे. त्यामुळे शेत पिकाचे मोठे नुकसान होत आहे. शिहू जांभुळटेप मुंढाणी येथीलशेतकर्‍यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्याने येथील शेतकर्‍याला संपूर्णतः शेतपिकावर अवलंबून रहावे लागते. अशातच येथील शेतकर्‍यांना ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, परतीचा पाऊस, अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते.
 
त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकर्‍यांपुढे जगावे की मरावे अशी द्विधा मनस्थिती निर्माण झालेली असते. शिहू जांभूळटेप विभागातील खाडीलगत असलेली शेतजमिनीला उधाणाच्या खार्‍या पाण्याचा धोका संभवतो. खारे पाणी शेतात शिरुन पिकती शेती उद्ध्वस्त होताना दिसते. त्यामुळे खाडीलगतच्या शेतजमिनीचे संरक्षण होण्याकरिता खारबंदीस्ती सुस्थितीत व मजबूत असणे गरजेचे आहे. बंदीस्ती फुटत असल्याने येथील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
 
येथील गरिब व हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांसाठी खारलँड विभागामार्फत बांधबंदीस्त बांधण्यास दुरुस्त करण्यास काम मंजूर करून येथील शेतकर्‍यांना या आलेल्या संकटापासून वाचवावे, असे आवाहन निवेदनातून करण्यात आले आहे. या कामाकडे वेळेत लक्ष देऊन तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा येथील सुपीक जमीन खार पाण्यामुळे नापीक होऊन शेतकरी जमीनदोस्त होण्याची वेळ येऊ शकते. संबंधित प्रशासनाने खार गांधे, चोळे व इतर खाडीची तात्काळ पाहणी करून त्वरित काम चालू करावे, अशी विनंतीवजा मागणी शिवसेना चोळे शाखा प्रमुख दीपक पाटील यांनी केली आहे.