मांडला-काकळघर रस्त्याच्या दूरवस्थेकडे दुर्लक्ष

20 Oct 2021 12:38:39
mandla_1  H x W
 
कोर्लई | गेल्या अनेक वर्षापासून मुरुड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील दुवा असलेल्या मांडला-काकळघर रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधित बांधकाम खात्याचे अद्यापही दुर्लक्षच आहे.
 
ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेऊन या रस्त्याचे काम तातडीने न झाल्यास याविरोधात मांडला ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचीता सुरेश पालवणकर यांनी तीव्र जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या अनेक वषारपासून मुरुड तालुक्यातील मांडला-काकळघर अंदाजे सात कि.मी.रस्त्याची खाच-खळगे व खडड्यांमुळे पार दुरवस्था झालेली आहे. दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याच्या कोट्यवधी रुपयाच्या कामाला मंजुरी मिळाल्याची चर्चा आहे, मात्र कामाचा अद्याप पत्ताच नाही.
 
मागील वर्षी तीन जुलैच्या निसर्गचक्रीवादळानंतर तसेच यंदा झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीने साळाव-मुरुड रस्त्यावर मांडला ते काकळघर या अंदाजे सात कि.मी. रस्त्याची जागोजागी खाच-खळगे व खड्ड्यांमुळे पार दुरवस्था झालेली असून दरम्यान यामागील एस.टी.सेवा बंद असल्याने सकाळच्या वेळेत फळ-भाजीपाला व दुध विक्री करणार्‍या महिलांना तसेच आजुबाजुच्या परिसरातील शेतकरी, शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिलांना, विशेष करून गरोदर मातांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
 
रस्त्याच्या दुरवस्थेबरोबरच येथील दुर्गम ग्रामीण भागातील दहा ते बारा गावांचा दुवा असलेल्या मांडला पुलाचीदेखील पार दुरवस्था झालेली आहे. बांधकाम विभागातर्फे पाहाणी करण्यात येऊन काही काळ हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. याठिकाणी नवीन पुलाची मागणी केली जात आहे. सरपंच नात्याने सुचिता पालवणकर ह्या गेल्या तीन वर्षांपासून संबंधित जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे काकळघर रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. याबाबतचे वृत्त ही वृत्तपत्रातून देण्यात आले होते. मात्र याकडे अधिकारी वर्गाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येते आहे.
 
पुलाच्या दुरवस्थेकडे अजून कानाडोळा केल्यास परिणामी परिसरातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात आहे. या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण तातडीने न झाल्यास वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार ग्रामस्थांतून व्यक्त केला जात असून याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारीवर्गावर राहिल, असा इशारा मांडला सरपंच सुचिता पालवणकर यांनी दिला आहे.
Powered By Sangraha 9.0