अलिबागच्या चार वर्षीय शर्वीका जितेन म्हात्रेचा आणखी एक पराक्रम

गुजरातचा गिरनार शिखर केला साडेपाच तासात सर

By Raigad Times    20-Oct-2021
Total Views |
Untitled-1 copy_1 &n
 
अलिबाग | अलिबाग येथील चार वर्षीय बाल गिरीरोहक शर्वीका जितेन म्हात्रे हिने रायगडच्या शिरपेचात अजून एक विक्रम नोंदविला आहे. तिने गुजरातमधील सर्वात उंच गिरनार शिखर सर केले असून तिने हे आव्हान साडेपाच तासात पूर्ण केले आहे. गिरनार शिखर सर करणारी अलिबागची शर्वीका ही भारतातील पहिली कन्या ठरली असल्याचे तिच्या पालकांनी म्हटले आहे.
 
शर्वीका हिने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक १९ ऑक्टोबर रोजी गुजरात मधील सर्वोच्च गिरनार शिखर सर करून एक नवा इतिहास महाराष्ट्राच्या नावावर नोंदविला आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे ३५०० फूट उंचीवर वसलेल्या गिरनारच्या गुरुशिखर ह्या सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी पायथ्यापासून सुमारे १०,००० (दहा हजार) पायर्‍यांचा टप्पा पार करावा लागतो.
 
घरापासून सुमारे ८५० किलोमीटरचे अंतर, १७ तासांचा प्रवास, रात्रीचा जंगल प्रवास, पहाटेची बोचरी थंडी, ह्या सर्व अडथळ्यांवर मात करत शर्विकाने सुमारे साडेपाच तासांच्या अथक परिश्रमानंतर गुजरातमधील सर्वोच्च शिखर गिरनारवर महाराष्ट्राचा स्वराज्य ध्वज आणि भारताचा राष्ट्र ध्वज फडकावला आहे. एवढे उंच शिखर चढून जाणारी शर्विका ही भारतातील सर्वात पहिली, सर्वात लहान कन्या ठरली आहे. तिच्या ह्या कामगिरीमुळे महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा गुजरातसह भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
 
alibag girl 2 copy_1 
 
आपल्या बारा जणांच्या टीमसह शर्विकाने १८ ऑक्टोबर च्या रात्री साडे दहा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात केली, आणि पहाटे ४ वाजता गिरनार शिखरावर राष्ट्र ध्वज आणि स्वराज्याची भगवी पताका फडकावली. तिच्या ह्या कामगिरीमुळे गिर्यारोहण क्षेत्रात पुन्हा एकदा सर्वात लहान वयात तिने आपले नाव अधोरेखित केले आहे.
 
गिरनार पर्वत सर करून पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची झलक दाखवून चौथ्या विक्रमांसोबत सलग अकराव्यांदा रेकॉर्डस् बुकमध्ये आपले नाव नोंदविले आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तीन वेळा, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड तीन वेळा, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन दोन वेळा तर ओ माय गॉड आणि डायमंड बुक रेकॉर्ड अशी दहा रेकॉर्ड तिच्या नावावर आहेत. तर आता सर केलेल्या गिरनार मोहिमेची इंडिया बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंद होणार आहे.
 
अलिबाग तालुक्यातील लोणारे हे शर्वीका हिचे गाव. अडीच वर्षांपासून शर्वीका हिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रति प्रेम निर्माण झाल्याने तिने आई-वडिलांसोबत गड, किल्ले सर करण्यास सुरुवात केली. शर्वीका हिने माथेरानमधील कठीण सुळका (कलावंतीण) वयाच्या अडीच वर्षात, नाशिक मधील सर्वात उंच किल्ला साल्हेर तिसर्‍या वर्षात, तर सर्वात उंच शिखर (कळसुबाई) साडेतीन वर्षांची असताना पादाक्रांत केला आहेत.