भयानक! पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकाला टेम्पोसह दिले पेटवून!

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील "त्या" घटनेचा धक्कादायक खुलासा

By Raigad Times    19-Oct-2021
Total Views |
Murder crime raigad_1&nbs
 
अलिबाग । मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका टेम्पोला आग लागून एकाचा जळून मृत्यू झाल्याची बातमी तुम्ही वाचली असाल. मात्र ही आग लागली नव्हती तर एकाला मारहाण करुन टेम्पोसह पेटवून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
 
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालवाहू टेम्पोला आग लागून एका इसमाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मृताचा जळून कोळसा झाल्यामुळे रसायनी पोलिसांनी टेम्पोच्या मालकाचा तपास सुरु केला. या तपासात मृताचे नाव सदाशिव संभाजी चिकाळे असून तो पुनावळे, ता.मुळशी, जि. पुणे येथील राहणारा असल्याचे पुढे आले.
 
सदाशिवच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला, तसेच भांडण करणार्‍याचे नावदेखील सांगितले. त्यावरुन पोलिसांची तपासचक्रे वेगाने फिरायला लागली. 13 ऑक्टोबरच्या रात्री सदाशिव भिवंडीवरुन टेम्पोमध्ये माल घेऊन पुण्याकडे निघाला होता. त्यानुसार त्याच्या मार्गावरील घटनास्थळापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासायला पोलिसांनी सुरुवात केली.
 
यावेळी एक कार टेम्पोचा पाठलाग करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ज्याच्यावर संशय होता तो इसमदेखील गायब होता. त्याचे मोबाईल लोकेशन देहू येथे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तेथून त्याला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली दिली आहे. बायकोचे व सदाशिवचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. त्यावरुन या दोघांमध्ये भांडणही झाले होते. याच संशयातून या इसमाने सदाशिवचा कायमचा काटा काढायचे ठरवले होते.
 
तो सदाशिववर पाळत ठेऊन होता. मंगळवारी (12 ऑक्टोबर) सदाशिव भिवंडीला टेम्पो घेऊन गेला आहे, असे समजताच दोन साथीदारांना घेऊन त्याने कळंबोली येथून सदाशिवच्या टेम्पोचा पाठलाग केला. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर त्याने आपली कार सदाशिवच्या टेम्पोसमोर आडवी घातली व टेम्पो बाजूला घ्यायला लावला. त्यानंतर सदाशिवला बेदम मारहाण करत बेशुद्ध केले व टेम्पोला आग लावून ते तिघे तेथून पसार झाले.
 
या भयानक गुन्ह्याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात हत्या, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादवि कलम 302, 201, 435, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून, एकजण फरार आहे. रसायनी पोलीस त्याच्या शोधात आहेत.