रायगडात काँग्रेसचे लचके तोडणार्‍यांना आम्ही सोडणार नाही

जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पुन्हा फटकारले

By Raigad Times    19-Oct-2021
Total Views |

MAHINDRA GHARAT_1 &n
 
उरण | रायगड जिल्ह्यात आमची लढाई अन्य कोणाशी नसून आमची आमच्याशीच लढाई आहे. अहंकार सोडला, हेवेदावे सोडले तर रायगड जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस नंबर १ वर असेल, असा विश्‍वास काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी व्यक्त केला. आमचे लचके तोडणार्‍यांना आम्ही सोडणार नाही, कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही, त्यामुळे आम्हाला कोणी गृहीत धरु नये, असा इशाराही त्यांनी दिला.
 
रविवारी (१७ ऑक्टोबर) पनवेल तालुक्यातील शेलघर येथील जोमा नारायण घरत सभागृहात झालेल्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत घरत यांनी चौफेर फटकेबाजी केली. या बैठकीला माजी अध्यक्ष जे.टी. पाटील, माजी सरचिटणीस डॉ.भक्तिकुमार दवे आणि भाजपाला राम राम करून स्वगृही परतलेल्या जी. आर. पाटील या जेष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. संघर्षमय कालखंडातही पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत घेऊन जाणार्‍या तमाम तालुकाध्यक्षांचा यावेळी महेंद्र घरत यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
 
महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी ‘क’ दर्जाची नगरपरिषद असूनही तब्बल ११ कोटी रुपये निधी खर्च करून अद्ययावत नुतन कार्यालय उभारल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या कोकण समितीच्या समन्वयकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
 
MAHINDRA GHARAT 1_1 
 
जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी रायगड जिल्ह्यात काँग्रेस कुठे आहे? असे विचारणार्‍यांना शानदार पदग्रहण सोहळ्यातून चोख उत्तर दिले. कोकणचे भाग्यविधाते बॅ. ए.आर.अंतुले यांच्यासमोर नतमस्तक होऊन मी कामाला सुरुवात केली. गेल्या सव्वा दोन महिन्यात रायगड जिल्हा पिंजून काढला. आज भाजपच्या भूलथापांना जनता वैतागली आहे. विकासाच्या नावाखाली लोकांना लुटले जात आहे. आज फक्त अंबानी, आदानी यांची प्रॉपर्टी वाढते आहे आणि भाजपची प्रॉपर्टी वृद्धिंगत होत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या जनतेला काँग्रेसकडून अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला तळागाळात जाऊन काम करावे लागेल, असे महेंद्र घरत म्हणाले.
 
‘वेल बिगन् इज हाफ डन’ असे म्हणातात. आपलीही चांगली सुरुवात झाली आहे. परंतु आपल्याला लढावे लागेल. स्व.मधुकर ठाकूर आणि स्व.माणिकराव जगताप यांच्याप्रमाणे झटून काम करावे लागेल. विश्वासघाताचा फटका बसला नसता तर या दोन दिग्गज नेत्यांनी रायगडमध्ये काँग्रेसचा तिरंगा कायम फडकत ठेवला असता. रायगड जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करण्यासाठी हेवेदावे आणि अहंकार दूर ठेवून आपल्याला एकदिलाने पुन्हा काम करावे लागणार आहे, असे ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
एक कार्यकर्ता म्हणून जनमानसात प्रसिद्ध होण्यासाठी लोकांची कामे करावी लागतात, व्हिजिटींग कार्ड छापून तो दर्जा प्राप्त होत नाही. आमचे लचके तोडणार्‍यांना आम्ही सोडणार नाही, आम्ही कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही, आम्हाला कोणी गृहीत धरु नये, असा इशाराही जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिला.

MAHINDRA GHARAT 2_1 
 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना महेंद्र घरत म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. जिल्ह्यामध्ये आघाडी प्रस्थापित करण्याबाबतचा निर्णय सगळ्यांची मते विचारात घेऊन मगच घेतला जाईल. परंतु कुणीही कुठेही परस्पर आघाडी करायचा प्रयत्न करु नका. सक्षम उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी गटनिहाय आणि गणनिहाय बैठका घेतल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
या बैठकीला माजी अध्यक्ष जे. टी. पाटील, माजी सरचिटणीस डॉ. भक्तिकुमार दवे, जी. आर. पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील, नंदा म्हात्रे, चिटणीस ऍड.प्रवीण ठाकूर, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी सदस्य तसेच रायगड जिल्हा महिला सेल अध्यक्ष ऍड. श्रद्धा ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मोईस शेख, विधी व न्याय सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष ऍड.के. एस. पाटील, महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप, नाना जगताप, सुजय जगताप, सेवादल महाराष्ट्र प्रदेश सचिव मोनिका पाटील, सोशल मिडीया सेल कोकण समन्वयक अभिजीत पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी, गणेश म्हात्रे, मिलिंद पाडगावकर, प्रदेश प्रतिनिधी इस्माईल घोले, पनवेल तालुकाध्यक्ष महादेव कटेकर, उरण तालुकाध्यक्ष जे. डी. जोशी, कर्जत तालुकाध्यक्ष मुकेश सुर्वे, खालापूर तालुकाध्यक्ष रमेश म्हात्रे, तळा तालुकाध्यक्ष खेडु वाजे, माणगाव तालुकाध्यक्ष विलास सुर्वे, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष विजय तोडणकर, म्हसळा तालुकाध्यक्ष डॉ. मोईस शेख, महाड तालुकाध्यक्ष राजेंद्र कोरपे, खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, रोहा शहर अध्यक्ष मितेश कल्याणी, नागोठणे शहर अध्यक्ष अशफाक पानसरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.