कर्जत : शेलूचे सरपंच शिवाजी खारीक यांचे अपील कोकण आयुक्तांनी फेटाळले

19 Oct 2021 20:56:52
Konkan Commissioner_1&nbs
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायतीचे विद्यमान थेट सरपंच शिवाजी बाबू खारीक यांचे सरपंचपद रायगड जिल्हाधिकारी न्यायालयाने डिसेंबर 2020 मध्ये तीन अपत्ये असल्याने रद्द ठरविले होते. या आदेशाविरोधात खारीक यांनी कोकण आयुक्त न्यायालयात दाद मागितली होती. दरम्यान, कोकण आयुक्तांनी 27 सप्टेंबर रोजी निर्णय देत जिल्हाधिकार्‍यांचा आदेश कायम ठेवला आहे.
 
शिवाजी खारीक शेलू ग्रामपंचायतीमध्ये 2018 मध्ये थेट सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यांनी निवडणूक लढविताना दाखल केलेल्या शपथपत्रात तीन अपत्ये असताना सदर माहिती लपवून ठेवली म्हणून ग्रामस्थ विलास डुकरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने निर्णय देताना डिसेंबर 2020 मध्ये शिवाजी खारीक यांचे थेट सरपंच रद्द केले.
 
त्यानंतर शिवाजी खारीक यांनी या निर्णयाविरोधात कोकण आयुक्त न्यायालयात अपील करुन दाद मागितली. त्या अर्जावर सुनावणी झाली. त्यात दोन्ही बाजूच्या वकीलांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने 27 सप्टेंबर रोजी सरपंच शिवाजी खारीक यांच्या अपिलावर निर्णय दिला. त्यात शेलू गावातील नरेश श्रीराम खारीक यांच्या लग्नाच्या पत्रिकेतून शिवाजी खारीक यांच्या नावापुढे दोन पत्नींची नावे तसेच त्या दोन्ही पत्नींबरोबर तिन्ही मुलांचे असलेले फोटो हा पुरावा ग्राह्य धरण्यात आला.
 
तसेच शिवाजी खारीक यांना तिसरा मुलगा असून त्याचा जन्म सप्टेंबर 2001 नंतरचा आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. त्यानुसार शिवाजी खारीक यांचे सरपंचपद रायगड जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने 9 डिसेंबर 2020 मध्ये रद्द केले होते, तो निर्णय 27 सप्टेंबर रोजी कायम करुन शिवाजी खारीक यांचे अपील फेटाळण्यात आल्याचा निर्णय कोकण आयुक्त यांच्या न्यायायलाने दिला.
 
त्या आदेशावर कोकण विभागाचे अप्पर आयुक्त किसन जावळे यांची सही असून कोकण आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात शिवाजी खारीक ग्रामविकास मंत्र्यांकडे दाद मागतात काय? याकडे शेलू ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
Powered By Sangraha 9.0