राज्यातील दुकाने, उपहारगृहे, मॉलची वेळमर्यादा वाढली; राज्य सरकारचा निर्णय

By Raigad Times    19-Oct-2021
Total Views |
MANTRI MANDAL_1 &nbs
 
मुंबई | करोना रुग्ण आलेख घसरल्याने दिवाळीच्या तोंडावर दुकाने, उपहारगृहे, मॉलची वेळमर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. राज्यातील सर्व उपहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
 
दुकाने आणि उपहारगृहांची वेळमर्यादा वाढवून देण्याची मागणी दुकानदार, व्यापारी आणि उपहारगृह मालकांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सोमवारी टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर राज्यातील उपहारगृहे आणि दुकाने यांची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरू केली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपहारगृहांची वेळ देखील वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. आता याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.
 
बुधवारपासून महाविद्यालये, तर शुक्रवारपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होणार आहेत. त्याच दिवसापासून करमणूक उद्याने खुली करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता शॉपिंग मॉल, र्सर्व व्यापारी दुकानांची वेळ वाढवून देताना रात्री १२ नंतर कोणतेही दुकान सुरू राहणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे.