सैनिक हो तुमच्यासाठी! सीमेवरील जवानांसाठी पाठविणार 5 हजार दिवाळी फराळाचे बॉक्स

19 Oct 2021 21:45:37
Diwali Faral Indian Army_
 
पनवेल । भारत विकास परिषद, पनवेल, हिंदू नववर्ष स्वागत समिती दहिसर, आनंदवन मित्र मंडळ मुंबई, विविसू डेहरा यांच्यातर्फे सीमेवरील सैनिकांसाठी दिवाळी फराळ पाठविण्यात येणार आहे. चकली, चिवडा, लाडू, शेव भरलेले 5 हजार बॉक्स सैनिकांना पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
 
सद्यस्थितीत 2 हजार बॉक्स तयार झाले आहेत. यासाठी भारत विकास परिषदेचे सदस्य मेहनत घेत आहेत. गतवर्षी सैनिकांना 14 हजार लाडू पाठविण्यात आले होते. संस्थेचे हे दुसरे वर्ष असून सैनिकांना दिवाळीसाठी फराळ पाठवण्याचे शिवधनुष्य भारत विकास परिषदने यशस्वीरित्या पेलले आहे. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष गिरीश समुद्र, सचिव नितीन कानिटकर यांसह अन्य पदाधिकार्‍यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते आहे. यापुढेही असेच उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सुबोध भिडे यांनी सांगितले.
 
जम्मू काश्मीर, मेघालय, मणिपूर, भुज, लेह येथील सैनिकांना दिवाळी फराळ पाठविण्यात येणार आहे. आपल्या जीवाची तमा न बाळगता सैनिक सीमेवर लढत असतात. आपण सारेजण दिवाळीत पदार्थ खातो, मात्र सीमेवर जवान आपले रक्षण करतात, ते घरापासून लांब असतात. त्यांना दिवाळीत घरातील कुटुंबियांनी पाठविलेला दिवाळी फराळ खाता यावा, यासाठी त्यांना घरगुती बनविलेले पदार्थ पाठविण्यात येणार आहेत.
 
हा दिवाळी फराळ दिवाळीच्या आधी सैनिकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे ज्योती कानिटकर यांनी सांगितले. भारत विकास परिषद पनवेल शाखेत एकूण 128 सदस्य आहेत. लोकसहभागातून दिवाळी फराळाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. गतवर्षी 371 नागरिकांनी देणगी दिली होती. आतापर्यंत 275 जणांनी दिवाळी फराळ कार्यक्रमाला हातभार लावलेला आहे.
 
या उपक्रमात ज्यांना कोणाला मदत करायची आहे त्यांनी ज्योती कानिटकर 8424048253 यांच्याशी संपर्क साधावा.
Powered By Sangraha 9.0