शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूला बॅ.अंतुले यांचे नाव द्यावे

18 Oct 2021 18:47:23
Nhava Sheva_1  
 
उरण | नव्याने उभ्या राहत असलेल्या शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतूला कोकणचे भाग्यविधाते समजले जाणारे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. त्यांनी या मागणीचा विचार व्हावा, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
बॅ. अंतुले यांनी रायगड जिल्ह्यात अनेक मोठमोठे प्रकल्प आणून जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली.
 
कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडचे नाव दिले. त्यांनी मुख्यमंत्री असताना अनेक धाडसी निर्णय घेऊन रायगडचा कॅलिफोर्निया बनविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. परंतु अल्पावधीतच त्यांना पदावरुन जावे लागल्याने ते स्वप्न अधुरे राहिले आहेत. तसेच केंद्रीय मंत्री असताना जिल्ह्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. त्याचा फायदा जिल्ह्याबरोबर देशातील जनतेलाही होत आहे. असे धाडसी नेतृत्व फक्त जिल्ह्यापुरतेच मर्यादित नव्हते तर ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते म्हणून समजले जात होते.
 
असे जनमानसाचे नेतृत्व असलेल्या बॅ. ए. आर. अंतुले यांचा यथोचित सन्मान व्हावा, यासाठी त्यांचे नाव न्हावाशेवा-शिवडी पुलाला देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही याचे समर्थन करीत या मागणीचा विचार व्हावा, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
 
दरम्यान, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या या मागणीचे जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत होत आहे. त्याचबरोबर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0