जेएसडब्ल्यू कंपनीविरोधातील शिवसेनेचे आंदोलन स्थगित

17 Oct 2021 20:19:46
JSW _1  H x W:
 
पेण । जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात शिवसेनेने पुकारलेले उद्याचे जनआंदोलन स्थगित करण्यात आले आहे. तशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 18 ऑक्टोबर रोजी पोलीस भरती असल्याने पोलीस अधीक्षकांनी केलेल्या विनंतीला मान देऊन सदरचे जनआंदोलन स्थगित करण्यात आल्याचे आ.दळवी यांनी सांगितले.
 
पोलादनिर्मिती कंपनी करणारी जिंदाल स्टील वर्क्स ही कंपनी पेण तालुक्यातील वडखळनजीक डोलवी येथे कार्यरत आहे. या कंपनीने स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकर्‍या न देता सुमारे 25 ते 30 हजार परप्रांतीय कामगारांची भरती केल्याच्याविरोधात शिवसेनेने 18 ऑक्टोबरला जनआंदोलनाचा इशारा दिला होता.
 
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, कंपनी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या मुंबई येथील शिवनेरी निवासस्थानातील दालनात बैठक घेतली. या बैठकीला कंपनीचे अधिकारी एस.एम. पाटील, प्रेसिडेंट गजराज राठोड, व्हाईस प्रेसिडेंट कॅप्टन राजेश रॉय, एचआर हेड दिलीप कुमार सिन्हा, जनरल मॅनेजर प्रविण म्हात्रे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, आमदार महेंद्र दळवी, खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते.
 
या बैठकीत कंपनी प्रशासनाने स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे मान्य केले असून, मेडिकल झालेल्या व कामावर न घेतलेल्या कामगारांना त्वरित सेवेत सामावून घेण्याचे कबूल केले आहे. याचबरोबर येत्या दहा दिवसांत कांदळवनाचा प्रश्न, प्रदूषणाचा प्रश्न व इतर प्रश्न सोडविण्याचे मान्य केले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
 
या पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, पेण तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी, शहर प्रमुख सुधाकर म्हात्रे, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, उपतालुकाप्रमुख भगवान पाटील, अच्युत पाटील, प्रसाद देशमुख, ओंकार दानवे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
 
18 ऑक्टोबर रोजी पोलीस भरती असल्याने पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन सदरचे जनआंदोलन स्थगित करण्यात आले आहे. पुढील दहा दिवसांत कंपनी प्रशासनाने स्थानिकांना न्याय न दिल्यास लोकआंदोलन मोर्चा काढून कंपनीचे कामकाज बंद पाडू, असा इशाराही आमदार महेंद्र दळवी यांनी दिला.
-------------------------------------------------- 
 
30 ऑक्टोबर रोजी गोदरेज व शिवसेनेची धडक
 
खालापूर तालुक्यातील पाचशे एकर जमिनीवर गोदरेज कंपनीचे काम सुरु आहे. सदर कंपनीने स्थानिकांना रोजगार न देता परप्रांतीय कामगारांची भरती सुरु केली आहे. याविरोधात 30 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचा धडक मोर्चा गोदरेज कंपनीवर नेण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Powered By Sangraha 9.0