माणगाव : उतेखोलवाडी गावची पाणी समस्या सोडविणार; पालकमंत्री आदिती तटकरे

By Raigad Times    16-Oct-2021
Total Views |
Screenshot_20211015_14182
 
माणगाव | माणगाव नगरपंचायत हद्दीतील उतेखोलवाडी गावाला भेडसावणारी पाण्याची समस्या जातीने लक्ष देवून सोडविणार असल्याची ग्वाही रायगडच्या पालकमंत्री आदिती सुनील तटकरे यांनी उतेखोलवाडी येथील बैठकीत बोलताना दिली.
 
पालकमंत्री आदिती तटकरे गुरुवार दि.१४ ऑक्टोबर रोजी नवरात्रौत्सवनिमित्त माणगावकरांचे ग्रामदैवत असलेल्या वाकडाई मंदिराच्या देवीचे दर्शन घेऊन उतेखोलवाडी गावात नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते संदीप खरंगटे यांच्या निवासस्थानी आल्या.याठिकाणी पालकमंत्र्यांची ग्रामस्थ व महीलांसमवेत उतेखोलवाडी गावाला भेडसावणाऱ्या पाणी समस्येबाबत बैठक झाली.या बैठकीत ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर सध्या कमी दाबाने व अनियमितपणे रात्री १० वाजता होत असलेल्या पाणीपुरवठा याबाबत आपल्या तक्रारी व व्यथा मांडल्या.
 
उतेखोलवाडी गावाला याअगोदर व्यवस्थित व नियमित वेळेत पाणी पुरवठा होत होता अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे यांनी दिली.मात्र नगरपंचायतीवर प्रशासक बसल्यापसून या गावात नेहमीच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.येथील महिलांनी काही दिवसांपूर्वी नगरपंचायतीवर या पाणी समस्येबाबत मोर्चा काढला होता.परंतु नगरपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.अखेर या गावांतील ग्रामस्थ व महिलांनी पालकमंत्री यांच्यासमोर गुरुवारी पाण्याची व्यथा मांडली.
 
याबाबतीत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तालुक्याच्या प्रांताधिकारी तथा नगरपंचायतीच्या प्रशासक प्रशाली जाधव दिघावकर यांच्याशी संपर्क साधून उतेखोलवाडीतील पाणी पुरवठा नियमित वेळेत सुरळीतपणे सुरू करा असे आदेश दिल्यावर येत्या चार दिवसांत येथील ग्रामस्थ व महिलांची बैठक घेऊन उतेखोलवाडीच्या पाणी प्रश्नांचे निराकरण केले जाईल असे प्रशासक दिघावकर यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी माणगाव नगरपंचायत हद्दीतील पाणी समस्येबाबत आपण विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले.
 
या बैठकीला तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती प्रियांका आयरे कांबळे,माजी सभापती संगीता बक्कम,माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे,संदीप खरंगटे,दिलीप जाधव,माजी पाणी पुरवठा सभापती जयंत बोडेरे,किशोरी हिरवे,चेतन गव्हाणकर आदींसह उतेखोलवाडी ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते.