परतीच्या पावसामुळे भातापिकाची नुकसानी; शेतकरी हतबल

16 Oct 2021 17:59:08
karjat_1  H x W
 
कर्जत | कर्जत तालुक्यात परतीच्या पावसाने भातपिकाचे मोठे नुकसान केले आहे.पावसाचा बेभरावसा आणि अल्प पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी कमी कालावधीत तयार होणारा भाताचे बियाणे वापरून त्याची लागवड करतात. दरम्यान, गणपती उत्सवानंतर तयार झालेले भाताचे पीक परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने भातपिकाचे शेतात नुकसान होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
 
कर्जत तालुक्यातील यावर्षी 8964 हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली आहे.प्रामुख्याने पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन शेतकरी भाताचे बियाणे निवडत असतात.मात्र परतीचा पाऊस लांबल्याने आज शेतात उभे असलेले भाताचे पीक अजूनही सुरू असलेल्या पावसामुळे खराब होऊ लागले आहे.हस्त नक्षत्र कालावधी संपल्यानंतर भाताचे पीक काढणीस तयार होईल असे नियोजन शेतकरी करीत असतात,त्यानुसार साधारण 120 दिवसात म्हणजे तीन महिन्यात तयार होणारे वाण बियाणे म्हणून वापरत असतात.
 
यावर्षी जून महिना उजाडला आणि मौसमी पाऊस सुरू झाला,त्यामुळे शेतकरी वर्गाने आणलेले बियाणे यांची राब भरणी केली.ते पीक सप्टेंबर महिन्याचे अखेरीस तयार झाले आहे.पण हस्त नक्षत्र संपून देखील परतीचा पाऊस थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.त्यात परतीच्या पावसासोबत येत असलेला वारा हा देखील भाताचे पिकाची नुकसानी करणारा ठरत आहे.कारण शेतात उभे असलेले भाताचे पीक यांचे वजन यामुळे थोडासा वारा असेल तर भाताचे रोप जमिनीवर कोसळत आहेत.त्यात परतीचा पाऊस अजूनही धुमाकूळ घालत असल्याने भाताची रोपे ही शेतातील पाण्यामुळे कुजून जात आहेत.
 
कर्जत तालुक्यातील ही स्थिती दुबार भातशेती करणारा राजानाला कालवा परिसर वगळता अन्य सर्व भागात शेतात भाताचे पीक तयार झाले आहे.त्यामुळे ते भाताचे पीक कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे.भाताचे पीक शेतातच कुजून जात असल्याने शेतकरी वर्ग संकटात आला आहे.त्यामुळे कर्जाच्या खाईत लोटलेल्या भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मंचाने कर्जत तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भाताच्या पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे.शेतकरी मंचाचे अध्यक्ष विनय वेखंडे यांनी आपल्या भागातील भाताच्या पिकाची स्थिती ही महापुराने अधिक नेस्तनाबूत झाल्याचे म्हटले आहे.त्यात आता सरता पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आणि त्यामुळे भाताच्या शेतीचे होणारे नुकसान टाळणे शक्य नाही अशी कैफियत मांडली आहे.
 
आम्ही शेतकरी मंचाचे शेतकरी यांनी गेली काही वर्षे पडणारा पाऊस लक्षात घेऊन साधारण 120 दिवसात तयार होणारे भाताचे पीक आपल्या शेतात लावले आहे.जास्त उत्पादन देणारा कर्जत 7 आणि जास्त उत्पन्न देणारा काळा तांदूळ तयार करण्याचे प्रयत्न परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले आहे.शेतात कोसळलेली भाताची पिके यांना शेतात असलेल्या पाण्यामुळे मोड आले आहेत,तर काही कुजून जात आहेत. - शशिकांत मोहिते-प्रगतशील शेतकरी, बोर्ले
-------------------------------------------------------------------------------------------- 
आमच्याकडे जिल्हाधिकारी कार्यकायकडून नुकसानग्रस्त भाताच्या पिकाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.त्यानुसार तालुका तहसीलदार यांच्या पत्रकाप्रमाणे कृषी विभाग,महसूल विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. - शीतल शेवाळे-तालुका कृषी अधिकारी
Powered By Sangraha 9.0