सर्पदंशाने श्रीवर्धन येथील तरुणाचा मृत्यू

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे आई-वडिलांना जबर धक्का

By Raigad Times    14-Oct-2021
Total Views |
snake bite_Shrivardhan_1&
श्रीवर्धन । श्रीवर्धन येथील 18 वर्षांच्या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. रोशन सुरेंद्र चोगले असे या मुलाचे नाव असून तो बारावी इयत्तेत शिक्षण घेत होता. रोशन हा त्यांच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे घरच्यांना धक्का बसला आहे.
 
श्रीवर्धन शहरातील गणेश आळी येथे राहणारा रोशन बुधवारी रात्री (13 ऑक्टोबर) जेवल्यानंतर साडेदहा वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता. यावेळी शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे रस्त्यावर अंधार होता.
 
रोशन रस्त्यावरुन चलला असताना त्याच्या पायाला सर्पाने दंश केला. त्यामुळे रोशन आरडाओरड करत, वडिलांना हाका मारतच घराकडे परतला व साप चावल्याचे त्याने वडिलांना सांगितले. यानंतर रोशनला तात्काळ श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
 
डॉ.मधुकर ढवळे यांनी उपचार सुरु केले; मात्र उपचार सुरु असताना, काही वेळातच रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रोशनचा मृत्यू झाला. रोशन हा र.ना. राऊत विद्यालयात बारावी इयत्तेत शिकत होता. त्याच्या आकस्मिक निधनाने श्रीवर्धनमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
 
रोशन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अशा जाण्याने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांना मोठा धक्का बसला आहे.