पोलादपूर : खा.सुनील तटकरे यांनी फेडला कलमजाई देवीचा नवस

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केलेला होता नवस

By Raigad Times    11-Oct-2021
Total Views |
DEVI KALAMJAI NAVAS TATKA
 
ग्रामस्थांनी पुन्हा केला केंद्रीय मंत्रीपदासाठी नवस 
 
पोलादपूर | तालुक्यातील तुर्भे पंचक्रोशीतील जागृत देवस्थान श्रीकलमजाई देवीच्या मंदिरातील जत्रेवेळी तत्कालीन राजिप अध्यक्षा आणि विद्यमान पालकमंत्री आदिती तटकरे यांनी त्यांचे वडील आणि लोकसभा निवडणुकीतील उमेदवार सुनील तटकरे यांच्या विजयाकरिता नवस केला होता. रविवारी (१० ऑक्टोबर) सकाळी खा.तटकरे यांनी श्रीकलमजाई मंदिरामध्ये जाऊन प्रचारादरम्यान केलेला हा नवस फेडला. यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे खा.तटकरे यांनी पुढीलवेळी केंद्रीय मंत्री म्हणून या मंदिरात पुन्हा यावे, असा नवस करून आपले प्रेम व्यक्त केले.
 
पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द आणि वझरवाडी गावांच्या सीमावर्ती भागात देवी कलमजाई मंदिर असून देवी कलमजाई, रवळनाथ, कुंभळजादेवी, देवीळमाळ, काळकाई आदी पंचायतन आहे तर समोरच वझरवाडीची गावपांढरदेखील आहे. याठिकाणी खा.सुनील तटकरे यांच्यासोबत सहदेव उतेकर, मधुकर उतेकर, सुदास मोरे, गोविंद उतेकर, मंगेश उतेकर, दत्ताराम उतेकर, वामन उतेकर, नामदेव उतेकर, कृष्णा उतेकर, नामदेव उतेकर, माजी सरपंच साक्षी मंगेश उतेकर, भगवान जाधव, सुर्यकांत जाधव, महादेव जाधव, बळीराम चव्हाण, अर्जून जाधव, नवनाथ शिंदे, श्रीहास शिंदे, शांताराम जाधव, शिवाजी जाधव, वसंत जाधव, सखाराम चव्हाण, शिवराम उतेकर, राजाराम उतेकर, सुंदर उतेकर, यशवंत उतेकर, ज्ञानदेव उतेकर, आत्माराम उतेकर आदी ग्रामस्थ नवसपूर्तीसाठी उपस्थित होते. यावेळी मधुकर उतेकर यांनी खा.तटकरे यांना ब्रिटीशकालीन पहिल्या महायुध्दातील शहिद स्तंभाच्या परिसराचे सुशोभिकरण करण्याचे निवेदन दिले.
 
याप्रसंगी खा.सुनील तटकरे यांनी कोरोना परिस्थितीमध्ये नवस फेडण्यास विलंब झाला असल्याने ग्रामस्थांची क्षमा मागून ग्रामस्थांचा विचार झाल्यास आपण स्वत: आणि पालकमंत्री आदिती तटकरे या मंदिराच्या जीर्णोध्दाराची संधी दिल्यास सेवा करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली. या परिसरातील लोकांनी दिलेल्या सहकार्यामुळे खासदार झाल्याबद्दल ॠण मानत असून येथील सेवेची संधीही मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदास मोरे यांनी केले.