नळ आले; पण पंधरा दिवसांनी येते पाणी
सूर्यकांत म्हात्रे/चिरनेर । उरण तालुक्यातील शंभर टक्के घरांमध्ये नळामार्फत पाणी पोहचल्याचा दावा रायगड जिल्हा परिषदेने केल्यानंतर उरणकरांच्या घशाला कोरड पडायचीच बाकी राहिली. अनेकांना धक्काच बसला आहे. नळ आणि पाणी फक्त उरण पंचायत समितीने रंगवलेल्या कागदांवरच आहे. पाणी नाही नळाला... पुरस्कार नुसता नावाला...अशी प्रतिक्रिया यानंतर उरणकरांमधून उमटली आहे.
राज्य शासनाच्या संबंधित कमिटीने कुठलीही शहानिशा न करता उरण तालुक्यातील सर्व म्हणजे 36 हजार 180 कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करणारा उरण हा राज्यातील पहिला तालुका म्हणून सन्मान प्रदान केला. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. केगाव, नागाव, करंजा-कोंढरी, कासवले या गावांत घरी नळ असला तरी त्याला पंधरा दिवसांनी आड एकदाच पाणी येते. अनेक ग्रामपंचायतींनी एमआयडीसीची पाण्याची बिले थकविल्याने पाणी कधीही बंद होऊ शकते, अशी परिस्थिती आहे.
उरण तालुक्यात नागरी वस्तीबरोबरच दुर्गम आदिवासी वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. वेश्वी, जांभूळपाडा, चिरनेर हद्दीतील चांदायल वाडी, केल्याचामाळ वाडी, पुनाडे वाडी, कोप्रोली आदिवासी वाडी या आदिवासी पाड्यांवर आजही भीषण पाणीटंचाई आहे. रानसई या आदिवासी ठाकूर वस्तीच्या गावात ओएनजीसी कंपनीने सौरऊर्जेचे पंप लावून विहिरीचे पाणी आदिवासींच्या घरात नाही तर वाडीत नेले आहे. त्यात उरण पंचायत समितीचे योगदान किती? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गावोगावच्या ग्रामसेवकांनी आपले अपयश झाकण्यासाठी उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना खोटी माहिती सादर केली असून पंचायत समिती प्रशासनाने मोठेपणाच्या हव्यासाने पूर्ण तालुक्यात नळ पाणीपुरवठा होत असल्याचा खोटा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करुन राज्य शासनाचा पुरस्कार मिळवला आहे. पहिल्यांदा पाणी टंचाईग्रस्त गावातील जनतेची समस्या दूर करा, असे निर्देश उरणचे सभापती सागर कडू यांनी दिले होते.
तरीही गटविकास अधिकारी निलम गाडे यांनी अतिउत्साहाने हा प्रस्ताव सादर केला. त्यामुळे ‘पाणी नाही नळाला, नुसता पुरस्कार नावाला’ अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.