तळामध्ये उनाड गुरांमुळे अपघातांची मालिका सुरुच

By Raigad Times    05-Jan-2021
Total Views |
Tala Accident_1 &nbs
 
रात्रीच्या अंधारात दुचाकी धडकून तरुण गंभीर जखमी
 
तळा । इंदापूर-मांदाड रस्त्यावर तळा शहरानजीक उनाड गुरांमुळे वारंवार अपघात होत आहे. सोमवारी (4 जानेवारी) रात्री अशाच एका अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे. रात्रीच्या अंधारात गुरे न दिसल्याने दुचाकी त्यांच्यावर धडकून हा अपघात झाला.
 
इंदापूरपासून मांदाडकडे जाणार्‍या रस्त्यावर तळा शहरानजीक उनाड गुरांमुळे वारंवार होणार्‍या अपघातांत काहींनी आपला जीव गमावला. तर अनेकांना गंभीर जखमी होऊन अपंगत्व आले. मात्र उनाड गुरांमुळे असे अपघात घडूनदेखील तळा नगरपंचायतीकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. केवळ नोटीसा काढून वेळ मारुन नेली जाते, मात्र त्याचे गंभीर परिणाम वाहनचालक, प्रवाशांना भोगावे लागत आहेत.
 
सोमवारी (4 जानेवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पुन्हा उनाड गुरांमुळे असाच एक अपघात तळा शहरानजीक मांदाड येथे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर घडला. स्कुटीवरुन शेणावली येथे जात असताना प्रविण जगताप (वय अंदाजे 29) याला उनाड गुरे दिसून न आल्याने तो गुरांवर धडकला आणि रस्त्यावर पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
 
अपघातानंतर त्याला तळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून नंतर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, परिस्थिती नाजूक असल्याने त्याला रात्रीच प्रविण जगताप याला मुंबईमधील जेजे रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
 
आता तरी तळा नगर पंचायत प्रशासनाने डोळ्यावरची पट्टी सोडावी आणि उनाड गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तळे शहरातील नागरिकांमधून होत आहे. 
 
वारंवार घडणार्‍या अपघातांमुळे कित्येकांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. तळा नगरपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
- धनराज गायकवाड, चिटणीस, तळा तालुक-शेकाप