पेणमध्ये 17 जानेवारीला होणार आगरी वकील-डॉक्टर परिषद

05 Jan 2021 14:47:15
Lawyer-Doctor_1 &nbs
 
अलिबाग । वकील-डॉक्टर हे समाजातील ज्ञानी, विचारवंत, बुध्दीवंत घटक असून, त्यांनाच समाजजीवनाचे आकलन अधिक चटकन होऊ शकते, म्हणूनच अशा प्रगल्भ विचारसरणीच्या आगरी समाजातील समस्त डॉक्टर-वकील वर्गाकडून समाजाच्या प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी एक ‘विचार मंथन परिषद’ रविवार, 17 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता आगरी समाज सभागृह चिंचपाडा-पेण येथे आयोजित करण्यात आली आहे.
 
योग्य मार्गदर्शनाअभावी इतरत्र भरकटत जाणार्‍या समाजातील तरुणाईच्या जीवनाला नवी कलाटणी देणारा यशाचा मार्ग कळावा, विस्थापित होऊ लागलेला समाज आणि परिवर्तनाचे विस्तारते परिघ यामध्ये हरवू लागलेले समाजाचे अस्तित्व, भरमसाट वेगाने वाढत्या नागरिकरणात आणि विकासाच्या चक्रात चिरडून जाणारे समाजाचे उजाड भविष्य, येणार्‍या काळात पेलावी लागणारी नव-नवी आव्हाने आणि या बदलत्या समाजरचनेत सामाजिक ऐक्य व आपसातला सलोखा टिकविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि पारंपरिक प्रथा परंपरेत गुरफटलेल्या समाजमनाला आधुनिक विचारांची सांगड घालून समाजाला मुख्य प्रवाहात आणावे. त्यासाठी कराव्या लागणार्‍या प्रयत्नांबरोबरच अन्य अंगांना स्पर्श करणार्‍या विचारमंथन कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीच्या भावनेने आगरी समाजातील समस्त डॉक्टर-वकील यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले मौलिक विचार प्रकट करावेत असे आवाहन अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी केले आहे.
 
यावेळी मुंबई-ठाणे येथील ज्येष्ठ वकील-डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. आगरी समाजातील समस्त डॉक्टर, वकील यांची संयुक्त ही विचारमंथन सभा प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. तरी समाजातील समाजबांधवानी थोडावेळ काढून आपले विचार, सूचना व मते मांडण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0