रायगड : सोन्याच्या दुकानात गिर्‍हाईक बनून आले चोर!

By Raigad Times    03-Jan-2021
Total Views |
thief_theft_Raigad Crime  
 
एकाला पकडले, दुसरा पसार; रोह्यातील घटना
 
अलिबाग । गिर्‍हाईक बनून सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या दोन चोरांपैकी एकाला पकडण्यात दुकान मालकाला यश आले. मात्र दुसरा सोन सोन्याच्या चैनी खेचून पसार झाला. रोहा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
 
ही घटना शुक्रवार, दि. 1 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी दुकान मालक (रा. रोहा) यांच्या सोन्याच्या दुकानात सायंकाळी उलवे-नवी मुंबई येथील दोघे जण गिर्‍हाईक बनून आले. त्यापैकी एकाने सोने खरेदीचा बहाणा करुन दुकान मालकाची नजर चुकवून सोन्याच्या चैन असलेले फोल्डर चोरले.
 
तो पळून जात असतानाच दुकान मालक व दुकानातील कर्मचार्‍याने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले आणि त्याच्या हातातील सोन्याच्या दागिन्यांचे फोल्डर चैनीसह हिसकावून घेतले. मात्र या गडबडीत दुसरा चोर फिर्यादी यांच्या हातातील सोन्याच्या चैनी असलेल्या फोल्डरमधून 46 हजार 200 रुपये किंमतीच्या दोन चैनी खेचून पसार झाला.
 
या घटनेप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकाला शनिवारी (2 जानेवारी) पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश जाधव हे करीत आहेत.