पर्यटन फुलले! दिवेआगर समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजला

By Raigad Times    24-Jan-2021
Total Views |
Raigad Tourism-Diveaagar_
 
हॉटेल, लॉजिंगसह स्थानिक व्यावसायिकांमध्ये समाधान
 
गणेश प्रभाळे/दिघी । यावर्षीच्या जानेवारी पहिल्या आठवड्यात लावण्यात आलेल्या संचारबंदी व विविध जलक्रीडासह जंजिरा किल्ला प्रवेश बंद असल्याने पर्यटकांची गोची झाली होती. मात्र, आता हळूहळू कोरोना संकट दूर होत असल्याने दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी पहायला मिळत आहे.
 
मागील दिवसात नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या संचार बंदीचा मोठा फटका श्रीवर्धनमधील हॉटेल व्यावसायिकांना चांगलाच बसला होता. खबरदारी घेण्यासाठी हे पाऊल उचलले होते. दिवेआगर पर्यटनाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात झाली असली तरी नववर्षाच्या हंगामात पर्यटकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, या विकेंडला शुक्रवार (दि.22) पासून पर्यटकांनी दिवेआगरला भेट दिली, जी आजवरची सर्वात उच्चांकी संख्या ठरत असल्याचे व्यवसायिक संतोष भाटकर सांगतात.
 
दिवाळीनंतर सुरु झालेल्या पर्यटन हंगामात जलक्रीडाचे खेळ तसेच दीर्घकाळ जंजिरा किल्ल्यातील प्रवेश बंद करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याने हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धनसह जंजिरा किल्ला पाहणार्‍या पर्यटकांमध्ये निरुत्साह दिसून आला. वेळोवेळी अनेक बुकींग पर्यटकांकडून रद्द होत होत्या. त्यामुळे व्यावसायिक नाराज होते.
 
आता वेगवेगळ्या वॉटरस्पोर्ट्ससोबत किल्ला पाहण्यासाठी ओघ वाढत आहे. पर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे. त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोठ्या हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचेेही बुकींग फुल झाले आहे.