पेण येथील चिकन महोत्सवाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

By Raigad Times    23-Jan-2021
Total Views |
chicken festival_1 &
 
रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पुढाकार
 
पेण (देवा पेरवी/प्रदीप मोकल) ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्‍वभूमीवर चिकनबाबत नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या पुढाकाराने पेण येथे शुक्रवारी (22 जानेवारी) मोफत चिकन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला पेण तालुक्यातील अधिकारी, पोल्ट्री व्यावसायिक परिवार व नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
 
गेले वर्षभर महाराष्ट्रासह संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून अनेक व्यावसायिकांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी नव्याने आलेल्या बर्ड फ्लूच्या भितीने अनेक खवय्यांनी चिकन खाणे टाळले होते. त्याचा विपरीत परिणाम पोल्ट्री व्यवसायावरही झाला आहे. हे चित्र बदलण्यासाठी या चिकन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिकन लॉलीपॉप, फ्राय चिकन, चिकन लेगपिस, चिकन बिर्याणी व अंड्यांच्या विविध पदार्थांवर खवय्यांनी चांगलाच ताव मारला.
 
या कार्यक्रमाचे उद्घाटन पेण नगरपालिका मुख्यधिकारी अर्चना दिवे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, राजिप सभापती डी.बी.पाटील, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, डॉ.मस्के, डॉ.अर्ले, हरीश बेकावडे, जिल्हा अध्यक्ष दिनेश खामकर, उपाध्यक्ष विलास साळवी, खजिनदार मनोज दासगावकर, सचिव दीपक पाटील, माहिती अधिकारी सानप आदी मान्यवर उपस्थित होते.
 
बर्ड फ्लू हा रोग बंदीस्त पोल्ट्रीमधील बॉयलर कोंबड्यांना होत नसल्याचा दावा पशुसंवर्धनचे डॉ.मस्के यांनी केला. तसेच 70 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाच्या वर व्यवस्थित शिजवलेल्या चिकनमधील बर्ड फ्लूचे विषाणू 3 सेकंदात मरतात व सदर पदार्थ खाल्ल्याने बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे नागरिकांनी मनसोक्तपणे बॉयलर कोंबडीपासून बनलेले पदार्थ खाण्याचे आवाहन डॉ.अर्ले यांच्याकडून करण्यात आले.
 
चिकनपासून बनलेल्या विविध पदार्थांची मोफत मेजवानी असल्याने या चिकन महोत्सवाला पेण तालुक्यातील शेकडो तरुण व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चिकनचा आस्वाद घेतला. या महोत्सवामुळे नागरिकांच्या मनातील बर्ड फ्लूची भीती निघून गेली असल्याची प्रतिक्रिया रायगड शेतकरी योध्दा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या संचालकांनी विशेष मेहनत घेतली आहे. चिकन महोत्सवाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर कोंबड्यांच्या व्यवसायाला तेजी येईल, असा विश्वास पोल्ट्री व्यावसायिकांनी व्यक्त केला.