वरुणच्या लग्नाची अलिबागेत जोरदार तयारी; उद्या उडणार बार

By Raigad Times    23-Jan-2021
Total Views |
Varun Dhawan_Natasha_in A 
  • धवन-दलाल कुटुंबीय विवाहस्थळी दाखल
  • मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत होणार विवाहबद्ध
अलिबाग । अभिनेता वरुण धवन त्याची बालमैत्रिण फॅशन डिझायनर नताशा दलाल हिच्यासोबत 24 जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. अलिबाग-सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे हा विवाह समारंभ कुटुंबीय व मोजक्याच मित्रमंडळींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
 
शुक्रवारी (22 जानेवारी) सकाळी नताशा दलाल हिला तिच्या मुंबईतील घरातून कुटुंबासह अलिबागला जाण्यासाठी कारमध्ये बसताना पाहिले गेले. काही कर्मचारी नताशाचे विवाहासाठीचे कपडे, इतर आवश्यक सामान, बॅगा कारमध्ये ठेवत होते. नताशाने यावेळी पांढर्‍या रंगाचा जम्पसूट आणि पांढर्‍या रंगाचा मास्क परिधान केला होता. तर दुसरीकडे वरुण धवन, त्याचे वडिल डेव्हिड धवन, आई लाली धवन, बहिण अंजनी हेही शुक्रवारीच मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाहून अलिबागकडे निघताना कॅमेर्‍यात टिपण्यात आले आहे.

Varun Dhawan_Natasha_in A 
 
वरुण आणि नताशा या जोडप्याने आपल्या विवाहाबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. मात्र त्यांचे निकटवर्ती कुटुंबीय व मित्रांनी रविवार, दि. 24 जानेवारी रोजी अलिबाग येथील ‘द मॅन्शन हाऊस’मध्ये वरुण-नताशा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वरुणचे काका अनिल यांनीही विवाहाच्या तारखेवर शिक्कामोर्तब केले आहे. मोजक्याच 50 कुटुंबीय-मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा विवाह समारंभ पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Varun Dhawan_Natasha_in A 
 
सहावीमध्ये असताना वरुण आणि नताशाची पहिली भेट झाली होती. अकरावी-बारावीपर्यंत ते चांगले मित्र होते. नंतर ही मैत्री प्रेमात रुपांतरीत झाली. गतवर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र उद्या (24 जानेवारी) ते विवाहाच्या पवित्र बंधनात अडकणार आहेत. अत्यंत साध्या आणि मोजक्याच जवळच्या मित्रपरिवार आणि कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हे जोडपे नव्या आयुष्यात पाऊल ठेवणार आहे.
 
Varun Dhawan_Natasha_in A 
 
जेथे हा विवाह समारंभ पार पडणार आहे त्या अलिबाग तालुक्यातील सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’मध्ये जोरदार तयारी झाली आहे. ‘डेस्टिनेशन वेडींग’साठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. तर या सेलेब्रिटी विवाहादरम्यान कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये, शांतता-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी मांडवा सागरी पोलीस सतर्क आहेत. गर्दी व अनुचित प्रकार टाळण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा सागरी पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत.