अलिबागमधून हापूस आंब्याची पहिली पेटी रवाना

22 Jan 2021 20:40:23
alibag mango_2  
  • वाशी मार्केटमध्ये व्यापार्‍यांनी केले स्वागत
  • डॉ.संदेश पाटील यांनी मिळवला मान
 
श्वेता जाधव
 
अलिबाग । यावर्षीची पहिली हापूस आंब्याची पेटी अलिबाग येथून शुक्रवारी (22 जानेवारी) वाशी येथील एमपीएमसी फ्रूट मार्केटमध्ये रवाना झाली आहे. खराब हवामान, अवकाळी पाऊस यामुळे यंदा थोडा उशिरानेच हापूस बाजारात आला आहे. तरी अलिबागचा आबा पहिला आला आहे.
 
तालुक्यातील हाशिवरे येथील बागायतदार डॉ.संदेश मारुती पाटील यांनी 2 डझन हापूस आंब्याच्या 6 पेट्या वाशी एमपीएमसी फ्रूट मार्केटमधील व्यापारी रविंद्र दशरथ जाधव व ॠषिकेश रविंद्र जाधव यांना विक्रीसाठी पाठवल्या आहेत. हंगामातील पहिला आंबा हा मुहूर्ताचा आंबा मानला जातो. त्यामुळे या आंब्याची विधिवत पूजा करून ‘पूर्ण हंगाम चांगला जाऊ दे’ अशी प्रार्थनाही केली जाते. अगदी पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आजही जपली जाते.
 
शुक्रवारी बाजारात आलेल्या हापूस आंब्याच्या पेटीची पूजा करण्यात आली. दरवर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हापूस बाजारात पाठविला जातो. यंदा मात्र खराब हवामान, अवकाळी पाऊस याचा फटका बसल्याने संक्रांतीचा मुहूर्त चुकला असून, थोडा उशिराने जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात हापूस बाजारात दाखल झाला असल्याचे बागायतदार डॉ.संदेश पाटील यांनी सांगितले. तसेच हा मुहूर्ताचा आंबा असल्याने या आंब्याचे दर ठरवण्यात आले नसल्याचेही त्यांनी सागितले.
 
यावर्षी आंब्याचे उत्पादन कमीच राहणार आहे. वादळात झाडांचे झालेले मोठे नुकसान, खराब हवामान, अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्याचा आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मुहूर्ताचा आंबा बाजारात आला असला तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरू व्हायला उशीर लागणार आहे.
 
दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये 25 ते 30 टक्के हापूस आंबा विक्रीसाठी बाजारात दाखल होतो. यंदा मात्र हे प्रमाण 5 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यताही डॉ.संदेश पाटील यांनी व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0