सुधागड : कानसळ येथील घरफोडीप्रकरणी तिघांना अटक

By Raigad Times    22-Jan-2021
Total Views |
thives_1  H x W
 
चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत
 
धम्मशील सावंत/पाली-बेणसे । सुधागड तालुक्यातील कानसळ गावातील फार्महाऊसमध्ये झालेल्या घरफोडीप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच खालापूरातील गुन्हेही उघडकीस आले आहेत.
 
कानसळ गावातील निलिमा जैन यांच्या फार्महाऊसमध्ये ही घरफोडी झाली होती. अज्ञात चोरांनी खिडकीवाटे प्रवेश करुन 3 हजार रुपये रोख व 1 हजार रुपये किंमतीची एक स्टीलची शेगडी, घरगुती वापरातील ताट, तांबे, वाट्या अशी एकूण रुपये चार हजारांची चोरी करुन पोबारा केला होता.
 
फार्म हाऊसमध्ये केअरटेकर म्हणून काम करत असलेल्या शैला भाऊ शिवलकर (रा.धोंडीवली, ता.सुधागड) यांनी याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी अज्ञात चोरांविरोधात भादंवि कलम 457, 380 अन्वये घरफोडी, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
चोरीला गेलेला ऐवज हा कमी किमतीचा असला तरी, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी गांभीर्याने दखल घेऊन तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तायडे यांनी वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली व्यक्तीशः लक्ष टाकून सदर गुन्ह्याचा तपास केला.
 
मोबाईल टॉवरचे लोकेशनद्वारे माहिती घेऊन प्रदेश काशिनाथ कातकरी (वय 21), मालती प्रदेश कातकरी (वय 21, दोन्ही रा.पुनाडे, ता. उरण) व सुदाम भगवान वाघे या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तपासात त्यांनी चोरीची कबुली दिली. तसेच खालापूर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या पाली हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यांना पाली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
 
पाली पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील तपास पोलीस नाईक एस. ए. पालकर हे करीत आहेत.