पोस्ट मास्तरने केला 6 कोटींचा झोल; पहा काय केलेत प्रताप

By Raigad Times    22-Jan-2021
Total Views |
panvel post martar_1 
  • पोस्टाचे बोगस किसान पत्र, राष्ट्रीय बचत पत्र तयार करणार्‍या टोळीतील चौघे गजाआड
  • बनावट दस्तऐवजांसह 6 कोटींचा मुद्देमाल हस्तगत
  • पनवेल शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
पनवेल । भारतीय डाक विभागाचे बोगस किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र तयार करुन त्याद्वारे बँकेतून कर्ज घेणार्‍या टोळीतील चौघांना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. एचडीएफसी बँक पनवेल येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून बनावट किसान पत्र, राष्ट्रीय बचत पत्र, रबरी स्टॅम्पसह सुमारे 6 कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे चौघांपैकी एक जण भारतीय डाक विभागातातील निलंबित पोस्ट मास्तर आहे.
 
या टोळीतील काही इसम पनवेल येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहायक पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी एचडीएफसी बँक पनवेल येथे सापळा लावून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ भारतीय डाक विभागाची 2 बनावट किसान विकास पत्र व 7 बनावट राष्ट्रीय बचत पत्र असे एकूण 9 बनावट दस्तऐवज मिळून आले.
 
या दोघांना पनवेल शहर पोलीस ठाणे येथे आणून चौकशी केली असता, सदर किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र हे बनावट असल्याचे निदर्शनास आले. भारतीय डाक विभागाकडून त्याची पडताळणी करुन घेण्यात आली. सदर किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र हे बनावट असल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
बाबाराव गणेशराव चव्हाण (वय 24, रा. बोलसा खुर्द, ता.उमरी, जि.नांदेड), सुप्रभात मल्लनप्रसाद सिंग (वय 50, रा. एच 4, रुम नं. 1003, व्हॅलीशिल्प, सेक्टर 36, खारघर, नवी मुंबई), संजयकुमार अयोध्या प्रसाद (वय 46, धंदा-नोकरी, रा. ए 702, साई क्रिस्टल, प्लॉट नं. 45, सेक्टर 35 डी, खारघर), दिनेश रंगनाथ उपाडे (वय 39, धंदा-कॉन्ट्रॅक्टर, रा. रुम नं. 49, सिंधी कॅम्प, इंदिरानगर, चेंबूर मुंबई) या चौघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाणे येथे भादंवि कलम 420, 465, 467, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे करीत आहेत.
 
निलंबित पोस्ट मास्तरचा प्रताप
 
अटक केलेल्या चौघांपैकी मुख्य सूत्रधार बाबाराव गणेशराव चव्हाण हा पूर्वी भारतीय डाक विभागात नांदेड येथे पोस्ट मास्तर (डाकपाल) पदावर नोकरीस होता. तेथे हेराफेरी केल्याने त्याच्यावर फौजदारी कारवाई करुन त्याला निलंबीत करण्यात आले आहे. चव्हाण याला पोस्ट खात्याच्या कामकाजाची पूर्ण माहिती असल्याने त्याने इतर साथीदारांसह बनावट किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्रे तयार करण्यास सुरुवात केली. हे बोगस दस्तऐवज विविध पतसंस्था व बँकांमध्ये गहाण ठेऊन त्याबदल्यात कर्ज घेऊन विविध पतसंस्था व बँकांची फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
 
बोगस किसान विकास पत्रांसह सुमारे 6 कोटींचा मुद्देमाल हस्तगत
यामध्ये 3 लाख रुपये किमतीचे भारतीय डाक विभागाचे एकूण 6 बनावट किसान विकास पत्र, 2 कोटी रुपयांचे भारतीय डाक विभागाचे एकूण 10 बनावट किसान विकास पत्र, 86 लाख 50 हजार रुपये किमतीचे भारतीय डाक विभागाचे 2 किसान विकास पत्र व 7 राष्ट्रीय बचत पत्र, 1 लाख 65 हजार रुपये किंमतीची वॅगनार कार, 1 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, बॉण्ड पेपर, भारतीय डाक विभागाचे 7 रबरी स्टॅम्प, 7 स्टॅम्प पेपर, 2 चेक, किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्राच्या छायांकित प्रती आणि इतर कागदपत्रे असा एकूण 5 कोटी 89 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.