श्रीवर्धन : सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने ‘कही खुशी कही गम’

By Raigad Times    21-Jan-2021
Total Views |
file photo_1  H
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडतीत ‘कही खुशी कही गम’ असे चित्र पहावयास मिळाले. तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीमधील सन २०२० ते २०२५ या कालावधीत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात गुरुवारी ता. 21 रोजी पार पडली. यात अनेक ठिकाणी फेरबदल झाल्याने ‘कही खुशी कही गम’ असे चित्र पाहायला मिळाले.
तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या 2020-25 च्या सरपंचपदाचे आरक्षण काढण्यासाठी श्रीवर्धन तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजता सोडत काढण्यात आली. या सोडतीत अनेक उलटफेर झाले असून सरपंच पदासाठी बाशिंग बांधून असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला असून अनेकांना अनपेक्षितपणे सोडत लागल्याने उत्साह दिसून येत होता. तालुक्यातील बहुतांश मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे आरक्षित झाल्याने ग्रामीण भागातील पुढाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
 
तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीमध्ये 22 ग्रामपंचायत ह्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यातील सात ग्रामपंचायत ह्या अनुसूचित जाती साठी राखीव तर सहा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तसेच 13ग्रामपंचायत ह्या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर उर्वरित वीस ग्राम पंचायतींपैकी सहा ग्रामपंचायत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, तीन अनुसूचित जातीसाठी, बारा सर्वसाधारण सरपंचांसाठी राखीव झाल्या आहेत. प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली हि आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार सचिन गोसावी सभापती बाबुराव चोरगे तसेच विविध पक्षाचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचे आरक्षण पुढीलप्रमाणे सर्वसाधारण महिलांसाठी असणाऱ्या कारिवणे, गुळधे, वाळवटीं, सर्वे, सायगाव, साखारोने, दांडगुरी, वडघर, निगडी, हरीहरेश्वर, वडवली, शिस्ते तर सर्वसाधारण वर्गातून कोलमांडला, रानावली, कुडगाव, शेखाडी, हरवीत, गानीक, खुजारे, बोर्लीपंचतन, गौळवाड़ी आणि भोस्ते येथे सरपंच असणार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी स्त्री वर्गातून गाळसुरे, कुडकी, चिखलप, भरडखोल, दांडा आणि कळींजे ह्या गावांचे सरपंच पद राखीव झाले आहे. तर दिघी, दिवेआगर, मेघरे, वांजळे, खारगाव, नागलोली याठिकाणी नामप्र वर्गानुसार सरपंच असेल. तसेच आदगाव, जसवली, आराठी, मारळ, वेळास, वाकलघर आणि बागमांडला ह्या ग्राम पंचायतीचे सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. महत्वाचे म्हणजे वाकलघर, बागमांडला, आराठी आणि वेळास येथे सरपंच पद हे स्त्री अनुसूचित जातींसाठी राखीव आहे.