शेततळ्यात शिरली मगर...बाहेर काढण्यासाठी 4 तास चालले रेस्क्यू ऑपरेशन!

By Raigad Times    21-Jan-2021
Total Views |
crocodile caught by fores 
  • माणगाव तिलोरे येथील घटना
  • सुरक्षित पकडून सोडले खाडीत
माणगाव (सलीम शेख) । माणगाव तिलोरे येथील एका शेततळ्यात मगर शिरल्याने गोंधळ उडाला होता. माणगाव वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सर्पमित्र तुषार साळवी यांच्या मदतीने बुधवारी (२० जानेवारी) या मगरीला सुरक्षितरित्या पकडले. तब्बल चार तास हे रेस्क्यू ऑपरेशन चालले. या मगरीला गोरेगावच्या खाडीत सोडण्यात आले आहे.
 
माणगाव तालुक्यातील तिलोरे येथे कासे यांचे स्वतःच्या मालकीचे शेततळे असून ते त्या तळ्यात मत्स्य व्यवसाय करतात. यावर्षीसुद्धा त्यांनी विविध प्रकारचे मासे सोडले होते. मात्र त्यांच्या या शेततळ्यात अचानक मगर शिरली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही बाब माणगाव वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली.
 
वन विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली व मगर तळ्यात असल्याची खात्री केली. त्याबाबतचा पंचनामा केला. मात्र अनेक दिवस उलटले तरी मगर काढणारी रेस्न्यू टीम उपलब्ध होऊ शकली नाही. मगरीने मोठ्या प्रमाणात माशांचे नुकसान केल्याचा अंदाज येत होता. त्यामुळे कासे यांची चिंता वाढत होती.
 
शेवटी गोरेगाव येथील सर्पमित्र तुषार साळवी हे मगर पकडतात, अशी खबर मिळाल्यावर त्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी जवळजवळ चार तास रेस्क्यू ऑपरेशन करून मगरीला पकडले आणि वन खात्याच्या ताब्यात दिले. या मगरीची लांबी एक मीटर व रुंदी सहा इंच असल्याचे वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी सांगितले.
 
या मगरीला वन अधिकार्‍यांनी सुरक्षितपणे गोरेगावच्या खाडीत सोडून दिले. दरम्यान, या मगरीने केलेले नुकसान शासनाने भरुन द्यावे, अशी मागणी कासे यांनी वन खात्याकडे केली आहे.