रोह्यात सरपंच आरक्षण सोडतीनंतर ‘कही खुशी, कही गम’

By Raigad Times    21-Jan-2021
Total Views |
Sarpanch Reservation_Gram
 
अनेक ठिकाणी इच्छूक झाले नाराज
 
रोहा/मिलिंद अष्टीवकर । नुकत्याच पार पडलेल्या रोहा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसह 64 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत गुरुवारी (21 जानेवारी) पार पडली. चिठ्ठ्यांद्वारे काढलेल्या आरक्षण सोडतीत निवडणूक झालेल्या 21 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 12 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद महिलांसाठी राखीव झाले आहे. या आरक्षण सोडतीनंतर अनेक स्थानिक नेत्यांच्या स्वप्नांवर पाणी पडले.
 
सरपंच आरक्षणात सोडतीत वाशी ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी पडले. रोठ खुर्दमध्ये सर्वसाधारण महिला, खांब सर्वसाधारण महिला, निडीतर्फे अष्टमीत ना.मा.प्र. महिला, वरवठणे सर्वसाधारण महिला, शेडसई ना.मा.प्र. महिला, वावेपोटगे ना.मा.प्र. महिला, तळाघर ना.मा.प्र. महिला, धामणसई ना.मा.प्र. महिला, चिंचवली तर्फे दिवाळी जमाती महिला, महत्वाच्या सर्वच ग्रामपंचायती सरपंच आरक्षण महिला पडल्याने अनेक ग्रामपंचायत नेतृत्व इच्छुकांना अक्षरशः मूरड मिळाल्याचे दिसून आले.
 
वरसे ग्रामपंचायतीत सरपंच आरक्षण सर्वसाधारण पडले. वरसे, रोठ बुद्रूक, गोवे, शेणवई ग्रामपंचायतीत सर्वसाधारण आरक्षण वगळता बहुतेक ग्रामपंचायतीत ना.मा.प्र. महिला, सर्वसाधारण महिला असेच आरक्षण पडले आहे. नुकत्याच पार पडलेल्या 21 ग्रामपंचायती सरपंच आरक्षणासह 2020-2025 साठीच्या धाटाव, आंबेवाडी, नागोठणे, मेढा, पिगोंडा, चणेरा, किल्ला, खारगांव, पिंगळसई अशा सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर झाले. त्यात प्रामुख्याने धाटाव ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण आरक्षण पडले. आरक्षण सोडतीत प्रामुख्याने महिला राज कारभारावर शिक्कामोर्तब झाले.
 
वाशीमध्ये अरविंद मगर यांची संधी हुकली...
 
अवघ्या तालुक्याचे लक्ष लागलेल्या आणि सर्वाधिक महत्वाची लढत झालेल्या वाशी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश मगर गट विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस लढतीत सर्वच्या सर्व 9 जागांवर सुरेश मगर गटाने बाजी मारली होती. तालुक्यात आणि धाटाव पंचक्रोशीत प्राबल्य असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला हा खूप मोठा झटका मानला जात होता. मात्र सरपंच आरक्षण अनुसूचित जमाती महिला जाहीर झाल्याने सुरेश मगर यांचे पुतणे अरविंद मगर यांची सरपंचपदाची संधी हुकली आहे.
 
रोठ खुर्दमध्ये जनार्दन मोरे यांचे स्वप्न राहिले अधुरे...
 
रोठ खुर्दमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षणाने दिनेश मोरे गटाला रोखून धरलेल्या जनार्दन मोरे यांचेही स्वप्न अधुरे राहिले आहे. कही खुशी, कही गम असेच सरपंच आरक्षण अनेक इच्छुकांसाठी ठरले आहे. सर्वसाधारण सरपंच आरक्षण पडल्याने रोठ खुर्द मध्ये अमित घाग यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गोवेत सरपंच पदासाठी महेंद्र पोटफोडे, घोसाळेत पुन्हा प्रतिभा पार्टे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते आहे.