आधी जेएसडब्ल्यूने थकवलेले १ हजार कोटी वसूल करा...नंतर सर्वसामान्यांची वीज तोडा!

20 Jan 2021 19:05:20
Pandit Patil_1  
  • शेकाप नेते पंडीत पाटील यांनी महावितरणला पुन्हा खडसावले
  • जेएसडब्ल्यूने 7 वर्षांपासून 1 हजार कोटी थकवले
  • थकबाकी वसूल न केल्यास शेकाप जेएसडब्ल्यूवरच मोर्चा काढणार!
अलिबाग : जनतेची फसवणूक करीत लॉकडाऊनमधील वीज बिल वसुलीचे आदेश देतानाच बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडीत करण्याचे निर्देश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास दिले आहेत. याविरोधात शेकाप नेते पंडीत पाटील यांनी जोरदार टिका केली आहे. सर्वसामान्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याआधी सात वर्षे 1 हजार कोटी बिल थकविणार्‍या जेएसडब्ल्यूचा वीजपुरवठा आधी खंडीत करुन दाखवा; मगच गोरगरीब जनतेच्या मीटरला हात लावा, असे त्यांनी 'महावितरण'ला बजावले आहेत.
 
जर जेएसडब्ल्यूकडून थकबाकी वसूल केली नाही तर शेकापच्यावतीने जेएसडब्ल्यूवरच मोर्चा काढण्याचा इशाराही पंडित पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सर्व भागातील कर्मचार्‍यांना तात्काळ वीज बिलाची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. थकलेल्या वीज बिलाची रक्कम न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा ताबडतोब बंद करण्यात यावा, असेदेखील निर्देश दिले आहेत. या सर्व प्रकाराचा आर्थिक आणि मानसिक भार हा ग्रामीण भागातील जनतेवर पडणार आहे.
 
आधीच कोरोनामुळे 6 महिने घरात काहीही उत्पन्नाचे साधन नसल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाला होता.आताकुठे जनजीवन सुरळीत होत असल्याचे चित्र दिसत होते. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबावर जगायचे कसे असा प्रश्‍न असताना महावितरणने वाढीव वीजबिले पाठवली होती.त्यासंदर्भात अनेक तक्रारी करूनदेखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सरकारकडून दिलासा मिळण्याची आशा मनाला लावून बसलेल्या ग्राहकांना महावितरणने तात्काळ वीजभरणा करायला सांगून मोठा धक्का दिला आहे.
 
या निर्णयावर प्रतिक्रीया व्यक्त करताना माजी आमदार पंडीत पाटील यांनी म्हटले आहे की, जेएसडब्ल्यू कंपनी लॉकडाऊनमध्येदेखील सुरु होती. तर सर्वसामान्यांचे सलूनपासून ते गॅरेजपर्यंत सर्व धंदे बंद होते. त्यांचे शासन वीज पुरवठा खंडीत करायला निघाली आहे आणि लॉकडाऊनमध्येही करोडो रुपये कमावले त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष करते. लोकांची ही फसवणूक थांबवा. राज्य सरकार गेल्या 7 वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाचा निकाल लवकर लावण्यासाठी राज्य सरकार यावर न्यायालयाकडे का मागणी करीत नाही, असा प्रश्‍नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.
 
पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली डिसेंबर महिन्यात शेकापचे तालुका चिटणीस अनिल पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती मिनल माळी, माजी उपसभापती अनिल गोमा पाटील आदींनी विद्यूत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. तेव्हाही त्यांनी जेएसडब्ल्यूचे थकीत वीज बिल आधी वसूल करण्याचा सल्ला दिला होता.
Powered By Sangraha 9.0