वीजदर कमी करण्याचे आमिष दाखवून ग्राहकांची होतेय फसवणूक

20 Jan 2021 16:55:06
MSCB EDIT PIC_1 &nbs
 
कल्याण महावितरण परिमंडळाकडून ग्राहकांना आवाहन
 
कल्याण । वीजबिल कमी करण्याची बतावणी करून वीज ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी महावितरणकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या कल्याण परिमंडळाकडून आवाहन करण्यात येते की, वीजबिलाच्या कोणत्याही तक्रारींसाठी महावितरणचे आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यालय अथवा संकेतस्थळ, मोबाईल अँप या डिजिटल माध्यमांचा वापर करावा. वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून किंवा महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रातच करावा व त्यांच्याकडून छापील भरणा पावती घ्यावी. वीजबिल भरणा व तक्रारींबाबत महावितरण बाह्य कोणत्याही व्यक्ती अथवा घटकांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
 
जागरूक वीज ग्राहक व महावितरणच्या सतर्क यंत्रणेमुळे गेल्या आठवड्यात शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे फसवणुकीच्या तयारीत असलेल्या एका भामट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यासंदर्भात उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या फिर्यादीवरुन अरुण कृष्णा शेळके (रा. नारायणगाव, ता. शहापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शहापूर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस तपासातून त्याचे साथीदार व फसवणुकीचे प्रकार उघड होत आहेत. यापूर्वी नालासोपारा पश्चिम उपविभागातही फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत.
 
वीजबिलाच्या तक्रारीसाठी महावितरणचे संबंधित कार्यालय तसेच www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल अ‍ॅपवर या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच वीजबिल भरणा करण्यासाठी अधिकृत बिल भरणा केंद्र, संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप, विविध पेमेंट अ‍ॅप आदी डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत. वीज ग्राहकांनी या सुविधांच्या माध्यमातूनच तक्रारी व बिल भरणा करावा. बाहेरील व्यक्ती अथवा घटकाच्या आमिषाला बळी पडून फसवणूक झाल्यास त्याला महावितरण जबाबदार राहणार नाही, याची नोंद घेऊन सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0