पेण तालुक्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव!

By Raigad Times    20-Jan-2021
Total Views |
Bird Flu enters in Pen Ra
 
  • तपासणीसाठी पाठविलेल्या 5 कोंबड्यांचे नमुने पॉझिटीव्ह
  • चिकन, अंडी विक्रेते धास्तावले
पेण (प्रदीप मोकल)। पेण तालुक्यातही ‘बर्ड फ्लू’ने शिरकाव केला आहे. अंतोरे फाट्यापुढे असणार्‍या पशुसंवर्धन विभागातील 562 बंदीस्त कोंबड्यांपैकी काही मोजक्या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे 5 कोंबड्या तपासणीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. त्यांचे अहवाल बर्ड फ्लू पॉझिटीव्ह आले. त्यामुळे येथील सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
 
अंतोरे फाट्यापुढे असणार्‍या पशुसंवर्धन विभागातील बंदीस्त कोंबड्यांपैकी काही कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. त्यामुळे 12 जानेवारीला तातडीने 5 कोंबड्या तपासणीकामी पुणे आरोग्य अतिरिक्त विभागाकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठांनी त्या भोपाळ येथे अधिक तपासणीसाठी पाठवल्या असता, 16 जानेवारीला त्यांचे अहवाल आले. या अहवालात तपासणीसाठी पाठविलेल्या कोंबड्या ‘बर्ड फ्लू’ पॉझिटीव्ह आढळून आल्याने लागलीच येथील सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
 
याबाबत पेण पशुसंवर्धन कार्यालयात 18 जानेवारी रोजी वरिष्ठांनी बैठक घेतली. या बैठकीला पशुसंवर्धन विभाग उपायुक्त डॉ.मस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.मरळे, सदन कुक्कुट पालन विकास गट पशुसंवर्धन विकास अधिकारी-पेण डॉ.अर्चना जोशी यांच्यासह इतर पशुसंवर्धन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत वरिष्ठ अधिकार्‍यांनी या संदर्भात मार्गदर्शन करुन कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले.
 
या घटनेचे गांभीर्य घेऊन पेण पशुसंवर्धन कार्यालयापासून पेणमधील काही नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. यावेळी कोणीही घाबरुन जाऊ नये, नागरिकांनी चिकन-अंडी बिनधास्त खावी; कारण 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत उकडल्यानंतर, शिजवल्यानंतर चिकन-अंडी जास्त तापमानामुळे सदर विषाणू मरण पावतात. त्यामुळे कोणीही याबाबत गैरसमज पसरवू नये, असे आवाहन करतानाच, विक्रीसाठी बंदी असल्याने येथील कोणत्याही पक्ष्याची विक्री झाली नसल्याचे डॉ.अर्चना जोशी यांनी सांगितले आहे.
 
दरम्यान, या घटनेमुळे पोल्ट्री व्यवसायिकांसह चिकन, अंडी विक्रेते धास्तावले आहेत. तर दुसरीकडे पेण नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी पशुसंवर्धन विभागात जाऊन औषध फवारणी करण्यात आली आहे.
----------------------------------------------------
रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पेण नगरपालिकेचे कर्मचारी तिथे पाठविण्यात आले आहेत. ते कर्मचारी तिथे औषध फवारणी तसेच इतर भागातील स्वच्छता करतील. यासह त्या विभागापासून 1 किलोमीटर परिसरातील सर्व चिकन सेंटर बंद करण्याचे आदेश आले असल्याने येथील चिकन सेंटर बंद आहेत.
- अर्चना दिवे, मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद
----------------------------------------------------