अलिबाग : चौल भोवाळे परिसरात 13 कोंबड्या दगावल्या

By Raigad Times    20-Jan-2021
Total Views |
Village Hens_Bird Flu_1&n
 
  • 4 नमुने तपासणीसाठी पाठविले
  • अहवालानंतरच स्पष्ट होणार मृत्यूचे कारण
अलिबाग । अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे परिसरात अचानक 13 कोंबड्या दगावल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी 4 कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणीच्या अहवालानंतरच या कोंबड्या ‘बर्ड फ्लू’ने दगावल्या की आणखी कशाने? हे निष्पन्न होणार आहे.
 
चौल भोवाळे परिसरात घरगुती कुक्कुटपालन करणार्‍या शेतकर्‍यांच्या कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. एकूण 13 गावठी कोंबड्या दगावल्याने येथील शेतकरी, ग्रामस्थ धास्तावले आहेत. याबाबत रायगड पशुसंवर्धन विभागाला कळविल्यानंतर, मृत कोंबड्यांपैकी 4 कोंबड्यांचे नमुने मंगळवारी (20 जानेवारी) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उद्या कोंबड्यांच्या तपासणीचे अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या कोंबड्या कशामुळे दगावल्या? याचे कारण स्पष्ट होणार आहे.
 
दरम्यान, तालुक्यातील चौल-भोवाळे येथे दगावलेल्या कोंबड्या या बॉयलर नसून गावठी आहेत. त्यांच्या मृत्यूचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे. मृत 13 कोंबड्यांपैकी 4 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उद्या अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती रायगड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांनी ‘रायगड टाइम्स’कडे बोलताना दिली.