रायगड जिल्हा शेतकरी संघटनेच्या सुधागड तालुकाध्यक्षपदी पांडुरंग तेलंगे

02 Jan 2021 15:45:03
Pandurang telange_1 
 
पाली/बेणसे । रायगड जिल्हा शेतकरी संघटनेच्या सुधागड तालुका अध्यक्षपदी पांडुरंग लिंबाजी तेलंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (29 डिसेंबर) संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष हरिश्‍चंद्र शिंदे यांच्या हस्ते व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
 
रायगड जिल्हा शेतकरी संघटना पाली सुधागडसह जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर व शेतीविषयाशी निगडित विविध प्रश्न व समस्या सोडविण्यात अग्रेसर राहिली आहे. शासनाच्या कृषी विषयक योजना व उपक्रम राबवून कृषी क्रांती घडविण्याच्या दृष्टीने संघटना व प्रत्येक पदाधिकारी तत्परतेने कार्यरत आहेत.
 
पांडुरंग तेलंगे शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याच्या दृष्टीने उभारलेल्या लढे व आंदोलनात सक्रिय सहभागी राहिले आहेत. पाली-खोपोली मार्ग रुंदीकरण भूसंपादन प्रक्रियेत शेतकर्‍यांना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी ते सातत्याने झटत आहेत. लाभार्थी शेतकरी घटकाला शासनाच्या विविध योजनांचा जलद लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून अधिकाधिक लोकांना न्याय मिळवून देण्यात तेलंगे यांचे योगदान महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.
 
ज्या विश्वासाने सुधागड तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली त्या पदाला साजेसे व शोभेसे काम करणार असल्याचे पांडुरंग तेलंगे म्हणाले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरिश्‍चंद्र शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष मारुती लांगी, पेण सुधागड रोहा मतदारसंघ अध्यक्ष रसिका पाठक, सुधागड तालुका सचिव कैलास दळवी, सहसचिव चंद्रकांत चव्हाण, ताराबाई सकपाळ, महादू मढवी आदींसह संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0