धक्काबुक्कीतून समुद्राच्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू

By Raigad Times    02-Jan-2021
Total Views |
edit pic_1  H x
 
मुरुडमधील घटना; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
 
मुरुड । धक्काबुक्कीतून एकाचा समुद्राच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना मुरुड तालुक्यातील आगरदांडा जेटी येथे घडली. याप्रकरणी एकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थर्टी फर्स्टच्या रात्री घडली.
 
सुमारे 3 महिन्यांपासून आगरदांडा जेटी येथे युबीसी इंजिनिअर्स प्रा.लि. या कंपनीमार्फत इंडीयन कोस्टगार्डच्या इमारतीचे काम सुरु आहे. याठिकाणी 14-15 जण सुतारकाम करीत आहेत. त्यामध्ये संजय ओराव बिसन ओराव (वय 24, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा.आगरदांडा ता.मुरुड) याचाही समावेश होता. सुतार, हेल्पर, फिटर असे सुमारे 40 कामगार सध्या याठिकाणी काम करीत असून, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्था कंपनीने कोस्टगार्डच्या ईमारतीच्या बाजुलाच झोपड्यांमध्ये केलेली आहे.
 
थर्टी फर्स्टच्या (31 डिसेंबर) च्या रात्री 8 वाजता या कामगारांपैकी संजय ओराव व सुजितसिंग हे थर्टी फर्स्टच्या सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मासे पकडण्यासाठी आगरदांडा जेटी येथे गेले होते. आगरदांडा नवीन जेटी येथे राजपुरी जेटीच्या कडेला बसून ते खाडीमध्ये गळ टाकून दारु पित बसले होते. यावेळी सुजितसिंग भरत सिंग हा संजय ओराव याला ‘मी आतापर्यंत तुझा हेल्पर म्हणून काम करीत आहे. आता मला मेस्त्रीकाम शिकव, म्हणजे मला मेस्त्री कामाची हजेरी मिळेल’ असे म्हणाला. तेव्हा संजय ओराव याने सुजितसिंग याच्या गालावर हाताने चापट मारली. म्हणून सुजितसिंगने त्याला धक्काबुक्की केली. त्यामुळे संजय याचा तोल जाऊन तो समुद्राच्या पाण्यात पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
 
याप्रकरणी संजय ओराव याचा चुलत भाऊ विश्वजित दशरथ ओराव (मूळ रा.ईस्लामपूर, जि.उत्तर दिनासपूर, पश्चिम बंगाल, सध्या रा. आगरदांडा ता.मुरुड) याने मुरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली केल्यानंतर, सुजितसिंग भरतसिंग (वय 26, मूळ राहणार-दार्जिलींग, पश्चिम बंगाल, सध्या रा. आगरदांडा ता. मुरुड) याच्याविरोधात भादंवि कलम 304 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ करीत आहेत.