मुरुड : सर्वे डोंगराचा धस धोकादायक

By Raigad Times    02-Jan-2021
Total Views |
korlai_1  H x W
 
रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधण्याची मागणी
 
कोर्लई । अलिबाग-मुरुड रस्त्यावर दांडा ते सर्वे दरम्यान रस्त्यावर फणसाड अभयारण्य क्षेत्रात असलेल्या सर्वे डोंगराचा धस ढासळण्याची शक्यता लक्षात घेऊन याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जाळी किंवा संरक्षक भिंत बांधण्यात यावी. अशी मागणी वाहनचालक, पर्यटक व नागरिकांतून जोर धरीत आहे.
 
मागील काही वर्षापूर्वी सर्वे डोंगराचा धस ढासळून माती व मोठे दगड रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. फणसाड वन्यजीव अभयारण्य व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सर्वे डोगराचा काही भाग उतरवून उपाययोजना करण्यात आल्या होत्या. 3 जुलै रोजी झालेले निसर्ग चक्रीवादळ तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार वादळी पावसानंतर पुन्हा सर्वे डोंगराचा धस ढासळून माती दगड खाली आली आहे.
 
या डोंगराचा धस ढासळून माती व दगड रस्त्यावर येण्याची व वाहतुकीवर परिणाम होण्याची भिती व्यक्त होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग व फणसाड अभयारण्य अधिकार्‍यांनी यात लक्ष पुरवून याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जाळी किंवा संरक्षक भिंत बांधण्यात यावी. अशी मागणी वाहनचालक, प्रवासी व नागरिकांतून होत आहे.