ग्रामपंचायत कार्यालयातून मृत्यू दाखल्यांचे कोरे पुस्तक गायब!

By Raigad Times    02-Jan-2021
Total Views |
 gram panchayat girane_1&n
 
गिरणे ग्रुप ग्रामपंचायतीमधील अजब प्रकार
चौकशीची होतेय मागणी
 
तळा/विराज टिळक । तळा तालुक्यातील गिरणे ग्रामपंचायतीतून मृत्यू दाखल्यांचे पूर्ण कोरे पुस्तकच गायब झाले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यालयाच्या दप्तरातून महत्वाची वस्तू अशी गायब झाल्याने अनेक शंकाही उपस्थित केल्या जात असून, चौकशीची मागणी जोर धरत आहे.
 
साधारणतः मृत्यू दाखल्याचा उपयोग हा वारस पंचनामा करण्यासाठी उपयोगी पडतो. या वारस पंचनाम्याने आपण बँकेतले पैसे वारसांच्या नावे करु शकतो, शेतीसाठी सातबारावर नोंदीलादेखील मृत्यू दाखला आवश्यक असतो. त्यामुळे कोरा मृत्यू दाखला जर एखाद्या भामट्याच्या हाती लागला, तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचा अंदाज येतो.

death certificates_1  
 
असाच काहीसा प्रकार गिरणे ग्रामपंचायतीत घडल्याचे समोर आले आहे. एका आदिवासी समाजाच्या मयत व्यक्तीच्या वारसाला हा दाखला देण्यात आलाय. भयानक प्रकार म्हणजे या दाखल्यावर ग्रामपंचायतीमधील लागणारे शिक्केदेखील मारण्यात आले आहेत. गिरणे ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाला याबाबत विचारले असता, त्यांना या प्रकाराबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
एखाद्या जबाबदार शासकीय कर्मचार्‍याला मृत्यू दाखल्याची वहीच गायब असल्याची माहिती नसावी, याबाबत शंका उपस्थित होत आहे. हा दाखला जरी खरा असला तरी त्यावर ग्रामसेवकाची स्वाक्षरी नाही. याची प्रस्तुत प्रतिनिधीने सखोल माहिती घेतली असता हे प्रकरण वेगळ्याच दिशेला जाऊन पोहोचले.
 
death certificates_1  
 
या ग्रामपंचायतीतील शिपायाने हा प्रकार केला असल्याचे ग्रामसेवक खंडू काळे यांनी सांगितले. गंभीर बाब म्हणजे, असे किती खोटे मृत्यू दाखले विविध कामात वापरले गेले असतील याची कल्पना ग्रामसेवक खडू काळे यांना नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जुने वापरात येणारे मृत्यू दाखले हे कालबाह्य झालेले आहे. असे असले तरी, त्यांच्या दप्तरातले मृत्यू दाखल्यांचे संपूर्ण पुस्तकच गायब असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
 
कपाटातल्या मुख्य मृत्यू दाखल्यासारख्या कोर्‍या पुस्तिका गायब असतील तर हा प्रकार ग्रामसेवकांच्या लक्षात कसा नाही? याबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे, हा प्रकार गंभीर असल्याने या ग्रामपंचायतीचे काटेकोर ऑडिट करण्याची मागणीही जोर धरत आहे.
-------------------------------------------------------- 
ग्रामपंचायत कार्यालयातील शिपायाने हा प्रकार केला आहे. आम्ही त्याचा तपास घेऊ.
- खंडू काळे, ग्रामसेवक, गिरणे ग्रामपंचायत
 --------------------------------------------------------
या कामात कोणताही हलगर्जीपणा झाला असेल तर त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी मी करणार आहे.
- ज्योती कैलास पायगुडे,
सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत गिरणे