लोणेरे ग्रामपंचायत निवडणूक : शिवसेनेने बालेकिल्ला राखला

By Raigad Times    19-Jan-2021
Total Views |
Shivsena Won gram panchay 
  • 11 पैकी 10 जागांवर सेनेचे उमेदवार विजयी; राष्ट्रवादीला 1 जागा
  • दणदणीत विजयानंतर काय म्हणाले जिल्हाप्रमुख अनिल नवगणे?
सलीम शेख/माणगाव । माणगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण अशा लोणेरे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर उमेदवार निवडून आणत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आणि आपला बालेकिल्ला राखला. राष्ट्रवादी काँग्रेसला येथे केवळ एक जागा मिळवला आली आहे.
 
माणगाव तालुक्यातील लोणेरे ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. येथे प्रामुख्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होती. या ग्रामपंचायतीचे 15 जानेवारीला मतदान होऊन 18 जानेवारीला सकाळी माणगाव तहसील कार्यालय याठिकाणी सभागृहात मतमोजणी झाली. मतमोजणीच्या दिवशी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची माणगाव तहसील कार्यालयाच्या आवाराबाहेर गर्दी होती. याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
निकाल बाहेर येऊ लागताच शिवसैनिकांनी एकमेकांना मिठी मारत जल्लोष केला. या ग्रामपंचायतीत शिवसेनेचे ज्योती दीपक ढेपे, शिवाजी महादेव ढेपे, गायत्री गजानन डवले हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मतमोजणीनंतर शिवसेनेचे प्रकाश करु टेंबे, सुजाता सुरेश टेंबे, समाधान शिवाजी करकरे, रविंद्र महादेव टेंबे, अनुष्का विशाल टेंबे, प्रमोद जगन्नाथ करकरे, प्रियांका श्रीनिवास टेंबे तर राष्ट्रवादीच्या संगीता संतोष शिर्के या एकमेव महिला उमेदवार विजयी झाल्या.
 
.....हा विजय शिवसैनिकांचा - अनिल नवगणे
 
शिवसेनेने दणदणीत विजय प्रस्थापित केल्यानंतर जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी हा विजय सर्व शिवसैनिकांचा असल्याची प्रतिक्रीया दिली. एकजुटीने शिवसैनिकांनी ही प्रतिष्ठेची निवडणूक लढवून जिंकली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसैनिकांनी लोणेरे ग्रामपंचायतीत पूर्णपणे लक्ष घालून विजय मिळविला. या विजयाने माणगाव तालुक्यात निश्चितच शिवसेना नंबर 1 चा पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही नवगणे म्हणाले.
 
शिवसेनेचे महाड विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र संघटक व लोणेरे गावातील सेनेचे कार्यकर्ते अरुण चाळके यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे लोणेरे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. ते वर्चस्व कायम राखण्यात आम्ही यशस्वी झालो असून लोणेरे भागात आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून भरपूर विकासकामे झाली असल्याने आम्ही निश्चितच ग्रामपंचायत निवडणुकीत यश संपादन करणार असा विश्वास होता, असेही चाळके म्हणाले.
 
यावेळी निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, महाड विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र संघटक अरुण चाळके, माजी सभापती राजेश पानावकर, महेंद्र तेटगुरे, माणगाव पंचायत समितीचे माजी सदस्य नथुराम करकरे, प्रताप घोसाळकर, विशाल टेंबे, महिला संघटक अरुणा वाघमारे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.