आगरी माणसाचे अस्तित्व धोक्यात...अशा देशोधडीला लावणार्‍या प्रवृत्तींविरुध्द संघटीत व्हा

By Raigad Times    19-Jan-2021
Total Views |
Agri community_maharashtr 
 
पेण येथील आगरी वकील-डॉक्टर संंयुक्त परिषदेत उमटला सूर
 
पेण (देवा पेरवी/प्रदीप मोकल) । आगरी समाजाचे नामोनिशाण मिटविणार्‍या, त्यांना देशोधडीला लावणार्‍या, त्यांना उद्ध्वस्त करणार्‍या प्रवृत्तींविरुध्द आपण आजच संघटीत झालो नाही तर भविष्यात समाजाला फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा धोका दाखविणारा एक सूर पेण येथे झालेल्या आगरी वकील-डॉक्टरांच्या परिषदेत उमटला आहे.
 
अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्यावतीने पेण येथील आगरी समाज सभागृहात रविवारी (17 जानेवारी) आगरी वकील-डॉक्टरांची संयुक्त परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील हे होते. तर उद्घाटन अलिबागच्या आदर्श पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील यांच्या हस्ते झाले. या विचारमंथन परिषदेत वकील-डॅक्टरांनी समाजाच्या अधोगतीची साधार भीती व्यक्त केली. अनेक उणिवांची, विविध समस्यांची, नाना प्रश्नांची उकल होणे काळाची गरज आहे, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.
 
या परिषदेत माजी न्यायाधीश डी.पी.म्हात्रे, पेण बार असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, पेण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन नाईक, समाजसेवी डॉक्टर सिध्दार्थ पाटील, भिवंडीचे आगरी कोळी मेडिकोजचे डॉ.तपन पाटील, अलिबागचे डॉ.विनायक पाटील, डॉ.महानंदा म्हात्रे, अ‍ॅड. स्मिता धुमाळ, अ‍ॅड.पुष्कर मोकल, डॉ.तुषार गावंड, सुरेश पाटील, संजय ठाकूर, अ‍ॅड.राजश्री गावंड, अ‍ॅड.के.एस. पाटील आदी अनेक वकील-डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त केली.
 
आगरी समाजाला सरस्वतीचे दर्शन फार उशिरांनी झाले असले तरी त्यांनी एकलव्याप्रमाणे नकळत विद्याग्रहण केली आहे. प्रगतीची नवनवी क्षितिजे पादाक्रांत केली आहेत. आज समाजात शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आर्थिकदृष्ट्याही तो बर्‍यापैकी संपन्न होऊ लागला आहे. ही एक समाधानाची बाब असली तरी दुसर्‍या बाजूला मात्र विदारक परिस्थिती पहायला मिळत आहे.
 
वाढू लागलेला पाशवी औद्योगिक विकास आणि उभ्या राहिलेल्या अजस्र नागरी वसाहती, यामुळे परप्रांतीयांच्या भाऊगर्दीत आगरी माणूस चिरडला आहे. मुंबई, नवी मुंबई, तिसरी मुंबई, नैना, स्वप्ननगरी अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून सरकारकडून मूळ निवासी असलेल्या आगरी माणसालाच सातत्याने विस्थापित करण्याचे कारस्थान रचले जात आहे. आस्ते-आस्ते पर्यावरणाचा हवाला देऊन मॅग्रोजचे भूत मानगुटीवर बसवून आगरी शेतकर्‍याला भूमिहीन केले जात आहे.
 
इतकेच नव्हे तर बाहेरुन आलेल्यांच्या अनधिकृत झोपड्यांना वारंवार संरक्षण दिले जात असताना आमच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांवर मात्र बेधडकपणे हातोडा मारला जात आहे. इतरांना आरक्षणाच्या अक्षता वाटल्या जात असताना आमच्या तोंडाला नुसती पानेच पुसली जात नाहीत तर साधी दखलही घेतली जात नाही. सत्तेच्या भागीदारीत तर आमचे स्थान शून्य राहिले आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आगरी माणसाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
 
सर्वच समाज एकसंघ झाले असून, ते आपापल्या मागण्यांसाठी झगडत आहेत. मात्र एकमेव आगरी समात अजूनही निद्रीस्त आहे. वेळीच जागे झालो नाही तर पुलाखालून पाणी वाहून गेल्यावर आदळआपट करण्यात काही अर्थ उरणार नाही, अशी सादही त्यांनी यावेळी समाजबांधवांना घालण्यात आली.