पोलादपूर तालुक्यातील पैठण येथील घटना
पोलादपूर (शैलेश पालकर) पोलादपूरातील पैठण येथे शेतात राब जाळण्यासाठी झाडाच्या फांद्या तोडताना वीज वाहक तारेला स्पर्श झाल्याने शेतकर्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (18 जानेवारी) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
संपत गंगाराम मोरे (वय 45) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. ते तालुक्यातील पैठण रस्त्यावरील शेतात जमिनीच्या मशागतीसाठी राब जाळण्याकरिता झाडाची पाने आणि फांद्या तोडत होते. एक फांदी लगतच्या विजेच्या खांबाच्या विद्युतवाहक तारेवर अडकली. यावेळी वीज वाहिनीच्या संपर्कात आल्याने, विजेचा तीव्र धक्का बसून संपत मोरे यांचा जागच्या जागी, झाडावरच मृत्यू झाला.
पोलादपूर पोलीस ठाण्यास या घटनेची खबर देण्यात आल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. तर पैठणचे सरपंच संतोष मोरे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन महत्वपूर्ण सहकार्य केले. दरम्यान, संपत मोरे यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.