कळंबोलीकरांना चढ्या दराने प्यावे लागणार ‘दूषित पाणी’!

By Raigad Times    16-Jan-2021
Total Views |
CIDCO _1  H x W 
  • दूषित पाणीपुरवठा होत असताना पाणीपट्टीत वाढ
  • नगरसेवक सतिश पाटील यांचे सिडकोला पत्र
 पनवेल । कळंबोली वसाहतीत सिडकोच्या घरांना मलमिश्रित पाणीपुरवठा केला जात आहे. दूषित पाणी येत असताना सिडकोने पाणीपट्टीमध्ये प्रति युनिट 20 रुपये इतकी वाढ केली आहे. त्यामुळे आता कळंबोलीकरांना चढ्या दराने दूषित पाणी प्यावे लागणार आहे. याविरोधात राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सतिश पाटील यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. सडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना पत्र देत वाढीव पाणीपट्टी कमी करण्याची मागणी केली आहे.
 
कळंबोली वसाहत सिडकोला 30 ते 35 वर्षांपूर्वी अल्प उत्पादन गटातील कुटुंबांसाठी घरे बांधली. त्यानंतर प्राधिकरणाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. वाढत्या लोकवस्तीच्या विचार करण्यात आला नाही. या घरांना अद्यापही जुन्याच जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या वाहिन्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या आहेत. त्याचबरोबर त्या अनेक ठिकाणी भुयारी गटारातून जातात. मलनिस्सारण वाहिन्या कित्येक ठिकाणी तुंबलेल्या आहेत. त्यांना अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. त्यामुळे हे मलमिश्रित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. याच दूषित पाण्याचा पुरवठा वसाहतीतील सिडकोच्या घरांना केला जातो.
 
सेक्टर 5 ई केएल 1 व 4 येथे अशाप्रकारे सुरुवातीला पाच ते दहा मिनिटे दूषित आणि अस्वच्छ पाणी येते. त्यानंतर संबंधितांना पाणी भरावे लागते. ते पाणीसुद्धा शुद्ध नसल्याने येथील रहिवाशांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. याच कारणाने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील जलवाहिन्या बदलून रहिवाशांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीच्या माध्यमातून पाठपुरावा सिडकोकडे सुरु आहे. मात्र परिस्थिती जैसे थे आहे.
 
असे असताना सिडकोने प्रति युनिट 20 रुपये इतका पाणीपट्टी दर वाढवला आहे. दूषित पाणी येत असताना रहिवाशांना वाढीव पाणीपट्टी भरावी लागणार आहे. ही बाब कळंबोलीकरांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. मलमिश्रित पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे रहिवाशांना मोजावे लागणार आहेत. त्यामुळे तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. या ठिकाणच्या लोकवस्तीत अल्प उत्पादन गटातील म्हणजेच माथाडी कामगार, रिक्षा चालक, भाजीपाला विक्रेते, बेस्ट कामगार यांच्यासह श्रमजीवी व्यक्तींचा समावेश आहे.
 
कोरोनाने अगोदर अनेकांचा रोजगार हिरावून घेतला आहे. कित्येकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यात सिडकोने 20 रुपये प्रति युनिट दराने पाणीपट्टी पाठवली असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. याठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याबरोबर पाणीपट्टी दरात झालेली वाढ कपात करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांच्यावतीने नगरसेवक सतिश पाटील यांनी केली आहे.
--------------------------------------------------
सिडकोच्या उदासीन धोरणामुळे कळंबोलीकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जलवाहिन्या बदलण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु सिडकोकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. दूषित पाणी मिळत असताना पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे. ही बाब अन्यायकारक असून याबाबत सिडकोला पत्र देण्यात आले आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनाही साकडे घालण्यात आले आहे.
- सतिश मोहन पाटील,
नगरसेवक, पनवेल महानगरपालिका
----------------------------------------------------