पनवेल : चेन स्नॅचिंग करणारा सराईत चोरटा गजाआड; एक फरार

By Raigad Times    14-Jan-2021
Total Views |
Chain Snatcher_1 &nb 
 
3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
 
पनवेल । खारघरसह, कामोठे, रबाळे आदी भागात चेन स्नॅचिंग करुन मोटारसायकलवरुन पसार होणार्‍या दोन लुटारुंपैकी एकाला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा कक्ष-3 च्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून 62 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह मोटारसायकल असा एकूण 3 लाख 15 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
 
नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांत ठिकठिकाणी मंगळसूत्र, सोनसाखळी, जबरी चोरीसारखे गुन्हे घडले होते. यासंदर्भात नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा कक्ष-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार, श्रीकांत शेडगे, इर्शान खरोटे, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत थारकर व त्यांच्या पथकाने या सराईत चोरांचा तपास सुरु केला.

Chain Snatcher_1 &nb 
 
नवी मुंबई, पनवेल, खारघर, रबाळे आदी ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, अभिलेखावरील आरोपी तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेतली. सखोल तपास करीत असताना सरफराज अल्लीउद्दीन शेख (38 रा.खारघर) हा उदयपूर (राजस्थान) येथे लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने सदर ठिकाणी सलग 20 तास पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. मात्र त्याचा साथीदार फरार झाला आहे.
 
सरफराज शेख याच्याकडून आतापर्यंत 62 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच गजाआड करण्यात येईल, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.