सुधागड : कोंडी धनगरवाडी राजिप शाळेने राबविला ‘चला पक्षी वाचवूया’ उपक्रम

By Raigad Times    14-Jan-2021
Total Views |
 School_Makar Sankrant _1 
 
विद्यार्थी, ग्रामस्थांनी घेतली नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ
सुधागड-पाली (गौसखान पठाण) नायलॉन मांजामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन सुधागड तालुक्यातील रा.जि.प.शाळा कोंडी धनगरवाडी येथे ‘चला पक्षी वाचवूया’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिक्षक राजेंद्र खैरे यांनी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांकडून पतंग उडवितांना नायलॉन मांजा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली.
 
सर्वप्रथम राजेंद्र खैरे यांनी विद्यार्थ्यांना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांची गावात जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘चला पक्षी वाचवूया, नायलॉन मांजा नको वापरायला, सुती मांजा द्या आम्हाला’ अशा घोषणा देत तसेच फलक दाखवत गाव दणाणून सोडले. विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजाचे दुष्परिणाम सांगत उपस्थित पालक, ग्रामस्थांचे प्रबोधन केले. सर्वांनी नायलॉन मांजा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली.
 
मकरसंक्रांत या सणाचे औचित्य साधून अनेकजण पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरल्यामुळे अनेक निष्पाप पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागतात. या धारदार नायलॉन मांजामुळे अनेकवेळा माणसांना गंभीर जखमा व प्रसंगी प्राणसुद्धा गमवावे लागतात. त्यामुळे सर्वत्र आशा स्वरुपाची जनजागृती होणे आवश्यक आहे, असे ग्रामपंचायत सदस्य बाळू ढेबे यांनी सांगितले.
-----------------------------------------------------
कोणताही सण हा आनंद घेऊन येत असतो. पण आनंद साजरा करतांना कळत-नकळत आपण पर्यावरणाची हानी व कोणाला इजा तर पोहोचवत नाही ना? याची दक्षता आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. विद्यार्थ्याचे बालमन हे अनुकरणशील व सुसंस्कारक्षम असते. त्यांच्यावर अशा उपक्रमांतून योग्य संस्कार झाल्यास भारताचे भावी सुजाण व कर्तव्यदक्ष नागरिक तयार होतील.
- राजेंद्र खैरे, उपक्रमशील शिक्षक
-----------------------------------------------------