जेएनपीटी महामार्ग खचला नाही फक्त लहान तडे गेले होते; प्रशांत फेंगडे यांचे अजब तर्कट

By Raigad Times    14-Jan-2021
Total Views |
JNPT highway_1  
 
चिरनेर । जेएनपीटी महामार्ग कधीच खचला नसून त्या रस्त्यावर फक्त लहान तडे गेले होते असा अजब दावा नॅशनल हायवे अथोरिटीचे अधिकारी प्रशांत फेंगडे यांनी केला आहे. नुकताच द्रोणागिरी विभागाजवळ खचलेल्या जेएनपीटी हायवे संदर्भात काय उपाययोजना केल्या संदर्भात विचारल्यावर त्यांनी हे तर्कट उत्तर दिले.
 
जेएनपीटी बंदरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी जेएनपीटी व नॅशनल हायवे अथोरिटी त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या आठ पदरी रस्त्याच्या कामांतर्गत जेएनपीटीचा रस्ता नुकताच द्रोणागिरी विभागात मोठया प्रमाणात खचला होता. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्याला मोठं मोठे तडे व भागदाडे पडून हा रस्ता खचला होता. त्यामुळे या 3000 कोटींच्या रस्त्याच्या कामाचा दर्जा सिद्ध झाला होता. या रस्ता खचल्यानंतर काय उपाययोजना केल्या असतील तर त्याबाबत हाय वे अथोरिटीचे अधिकारी प्रशांत फेंगडे यांच्याशी संपर्क केला असता सदर रस्ता कधीच खचला नसल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.
 
जेएनपीटी बंदराच्या विस्तारीकरणामुळे उरण तालुक्यातील रस्त्यावर अवजड वाहनांच्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात अपघात व वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी जेएनपीटी ते पळस्पे महामार्गाचे आठपदरी रुंदीकरण सुरू केले आहे.त्यासाठी तब्बल 3000 कोटींचा निधी खर्च होणार आहे.मात्र निकृष्ट कामामुळे हा रस्ता द्रोणागिरी विभागाजवळील पुला लगत मोठ्या प्रमाणात खचला. रस्ता खचून त्याच भराव रस्त्याखालील चिखलात जाऊन तो चिखलही रस्त्यावर आला होता. हे वृत्त सर्व वृत्तपत्रात येऊन रस्ता खचल्याचे प्रशांत फेंगडे यांनी मान्य केले होते.
 
मात्र तीन हजार कोटींचा चुना लावलेल्या या रस्त्याचे पितळ उघडे होऊ नये म्हणून आपल्या पूर्वीच्या वक्तव्याला यु टर्न मारून सदर रस्ता कधीच खचला नसल्याचे धक्कादायक वक्तव्य प्रशांत फेंगडे यांनी केले आहे. यासाठी त्यांची रस्त्याच्या कंत्रातदाराशी कितीची सौदे बाजी झाली असा सवाल आता उरणची जनता उघडपणे करताना दिसत आहे.