शिक्षक परिषदेच्या प्रयत्नांना यश
अलिबाग : सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या रकमेचा पहिला हप्ता अखेर शिक्षकांच्या फंडखात्यात जमा झाला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुधाकर घारे व शिक्षणाधिकारी शीतल पुंड यांच्या प्रयत्नाने ही रक्कम शिक्षकांना मिळाली आहे. प्राथमिक शिक्षक परिषदेने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. कोविडमुळे ही रक्कम जमा होण्यात अडथळे येत होते.
केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आला होता. मात्र १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ अखेर एकूण ३६ महिन्याचा फरक रक्कम कर्मचारी यांच्या फंड खाती ५ टप्प्यात जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. ३१ मार्च २०२० अखेर रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक यांच्या खाती रक्कम जमा झाली नाही. कोरोनामुळे ही रक्कम जमा होण्यात अडचणी येत होत्या .
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. परिषदेच्या शिष्टमंडळाने उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुधाकर घारे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षण संचालक पुणे यांच्या अर्थ विभागाकडे मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून त्या विभागाचे प्रमुख महेश माळी यांच्याकडे संघटना पातळीवर पत्रव्यवहार केला. प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक यांच्यासोबत झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा प्रश्र्न उपस्थित केला होता.
डिसेंबर २०२० वेतनासमवेत रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील 7 वा वेतन आयोग फरक रक्कमेचा पहिला हप्ता जीपीएफधारक शिक्षकांच्या जीपीएफ खात्यात व १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांचा डीसीपीएस धारक शिक्षकांना वेतन खात्यात रोखीने अदा करण्यात आला आहे.
रक्कम जमा झाल्याने शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातत्याने पाठपुरावा करून यश आल्याबद्दल व प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल संघटनेच्यावतीने सभापती घारे व शिक्षणाधिकारी पुंड यांचा सत्कार करुन आभार मानण्यात आले. शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, कोकण विभागीय प्रतिनिधी उमेश महाडेश्वर, जिल्हा संघटन मंत्री वैभव कांबळे, अलिबाग पतसंस्थेचे संचालक दिपक साळवी उपस्थित होते.